MD drugs seized in Pune: पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट सोमवारी उधवस्त करुन तीघा आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे कसून केलेल्या तपासात तब्बल ११०० कोटी रुपयांचे ६०० किलो मेफेड्रोन हस्तगत करण्यात आले. यातील ५० किलो मेफेड्रोन विश्रांतवाडी येथील गोडाऊनमधून तर ५५० किलो मेफेड्रोन कुरकुंभ येथील एका केमिकल कंपनीतून हस्तगत करण्यात आले.
या कंपनीच्या मालकाला आणि त्याच्यासाठी एम.डी.चा फॉर्म्युला तयार करणाऱ्या केमिकल इंजिनिअरला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान कंपनीतून विविध राज्यांत मालाचा पुरवठा झाल्याचे लक्षात आल्याने परराज्यात गुन्हे शाखेची पथके तातडीने रवाना करण्यात आली आहेत.
टेम्पो चालक आणि हमालाकडून मिळाली लिंक-
पोलीस आयुक्त अमितेष कुमार यांनी दिलेल्या माहितीनूसार, सोमवारी वैभव उर्फ पिंट्या भारत माने (रा.पुणे), अजय अमरनाथ करोसिया (३५, रा.पुणे) आणि हैदर शेख (रा.विश्रांतवाडी) यांना अटक करण्यात आले होते. त्यांच्याकडून साडेतीन कोटीचे एम.डी. हस्तगत करण्यात आले. त्यांच्याकडे माल कोठून आणण्यात आला याचा तपास करण्यात येत होता.
दरम्यान मालाची डिलिव्हरी घेऊन येणाऱ्या टेम्पो चालक आणि हमालालाकडे विचारणा केली असता, त्याने हा माल कुरकुंभ एमआयडीसीतील अर्थेकिंग प्रा.लि.केमिकल कंपनीतून आणला असल्याचे सांगितले. रात्रीच गुन्हे शाखेचे एक पथक तेथे रवाना करण्यात आले. तेव्हा कंपनीमध्ये एम.डी.सह इतर केमिकल उत्पादनाची निर्मीती सुरु होती.
कंपनीची झाडाझडती घेतली असता तब्बल ५५० किलो एम.डी.सापडले. कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतल्यावर डोंबिवली येथून एका केमिकल इंजिनिअरलाही ताब्यात घेण्यात आले. ही कंपनी ऑक्टोबर २०२३ पासून सुरु होती. या व्यवसायामागील मुख्य ब्रेन एक परदेशी नागरिक असल्याचे पुढे आले आहे. त्याचा युध्दपातळीवर शोध सुरु करण्यात आला आहे.
दरम्यान हे अंमली पदार्थ मुंबईमार्गे इतर राज्यातही पाठवण्यात येत असल्याचे उघड झाले. दरम्यान पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त(गुन्हे) शैलेश बलकवडे, उपायुक्त(गुन्हे) अमोल झेंडे, सहायक आयुक्त(गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली विविध राज्यांत पथके रवाना झाली आहेत.
ड्रग फ्री पुण्यासाठी प्रयत्न –
पोलीस आयुक्त अमितेष कुमार म्हणाले, अमली पदार्थाचा समाजावरआणि तरुणाईवर मोठा परिणाम होत आहे. यामुळे अमली पदार्थ विक्रीला आळा बसेल यासाठी आम्ही प्राधान्य देत आहोत. ड्रग फ्री पुण्यासाठी सुरु केलेल्या प्रयत्नांना हे एक मोठे यश आले. या रॅकेटची पाळेमुळे खोदून काढली जात आहेत.