नगर -जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या 33 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून, त्यातील 29 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यातील दोन व्यक्ती करोनाबाधित आढळून आल्या आहेत. यामध्ये 6 वर्षीय बालिका आणि 22 वर्षीय महिलेचा समावेश आहे. पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगूळ येथे माहेरी आलेली एक 22 वर्षीय गरोदर महिला करोनाबाधित आढळून आली आहे. ही महिला कळंबोली येथील आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. दरम्यान, बूथ हॉस्पिटलमधून तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे एकूण 74 बाधित रुग्णांपैकी आता 52 जण करोनामुक्त झाले आहेत.
मूळची मुंबई येथील 75 वर्षीय वृद्ध महिला राशीन येथे आली होती. तिला शुक्रवारी (दि.22) रोजी करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, अहवाल येण्यापूर्वीच त्या महिलेचा मृत्यू झाला होता. तिच्या संपर्कातील व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात या महिलेची 6 वर्षीय नात करोनाबाधित आढळली. याशिवाय पाथर्डी तालुक्यातील 22 वर्षीय महिला बाधित आढळून आली. तिला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असल्याने ग्रामीण रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तिचा घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला असता, ती करोनाबाधित आढळून आली, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.
दरम्यान, बूथ हॉस्पिटलमधून तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे एकूण 72 बाधित रुग्णांपैकी आता 52 जण करोनामुक्त झाले आहेत, तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 16 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. करोनामुक्त झालेले तीन पैकी दोन जण नगर शहरातील सुभेदार गल्ली येथील, तर एक जण वंजारगल्ली येथील आहे. या ठिकाणी कंटोन्मेंट झोन असल्याने या रुग्णांना बूथ हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात येणार आहे. आतापर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या वतीने एक हजार 986 व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी 1 हजार 851 व्यक्तींचे स्त्राव निगेटिव्ह आले असून, 72 व्यक्तींचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. यापैकी 6 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.