रत्नागिरी: करोना विषाणूचा संसर्ग लहान मुले, वयोवृद्ध आणि गरोदर मातांना होऊ नये यासाठी आरोग्य खात्याने विशेष लक्ष दिले आहे. मात्र, असं असतानाही रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात प्रसूतिसाठी आलेल्या 6 मातांनाच करोना संसर्ग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
प्रसूतिगृहातील एका नर्सलादेखील कारोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालय हाय अलर्टवर आले आहे. गरोदर मातांसोबतच आता नवजात बालकांच्या आरोग्याचाही गंभीर प्रश्न तयार झाला आहे.
6 गरोदर मातांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील आणि या ठिकाणाशी संबंधित 14 गरोदर मातांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. 14 गरोदर मातांसह काही नवजात बालकांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे की नाही हेही तपासले जाणार आहे. त्यामुळे आता या नवजात बालकांच्या करोना चाचणीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.