हाफिजच्या करोना अहवालाचा घोळ कायम
कराची – पाकिस्तानचा क्रिकेटपटू महंमद हाफिज याच्या करोना चाचणीच्या अहवाला वरून सुरू असलेला घोळ अद्याप कायम आहे.
सहा दिवसांपूर्वी केलेल्या चाचणीत तो पॉझिटिव्ह ठरला हता. मग त्याने खासगी लॅबमधून चाचणी केली तेव्हा अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, आता पुन्हा एकदा चाचणी केली व त्यात हाफिज पुन्हा पॉझिटिव्ह ठरला आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने इंग्लंड दौऱ्यावर पाकिस्तान संघ जाण्यापूर्वी सर्व खेळाडूंची चाचणी केली होती. त्यात पहिल्यांदा 3 तर नंतर 7 असे एकूण 10 खेळाडू पॉझिटिव्ह असल्याचे अहवालात नमुद केले होते. मात्र, महंमद हाफिजने खासगी लॅबमख्ये करोनाची चाचणी केली होती. त्या अहवालात तो निगेटिव्ह ठरला होता. त्यामुळे मंडळाने केलेल्या चाचणीबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
आता पुन्हा एकदा मंडळातर्फे चाचणी करण्यात आली व त्यात हाफिज पॉझिटिव्ह असल्याचे निदान करण्यात आल्याने जागतिक क्रिकेटमध्ये पाकिस्तानमधील चाचणी प्रक्रियेवर टीका करण्यात येत आहे.
पाकिस्तानचा संघ रविवारी इंग्लंडला रवाना होत आहे. या दौऱ्यात संघ 3 कसोटी व 2 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. संघ इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी मंडळाने पहिल्यांदा चाचणी केली होती. मात्र, हाफिजच्या दुसऱ्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर मंडळाने पुन्हा सर्व खेळाडूंची चाचणी केली व त्यात हाफिज पॉझिटिव्ह ठरला आहे.