अमृतसर : ऑक्सिजन तुटवड्यामुळे देशात दुर्दैवी घटनांचे सत्र सुरूच आहे. आता पंजाबमध्ये ऑक्सिजन अभावी 6 रूग्ण दगावल्याची माहिती पुढे आली आहे. ती हेलावून टाकणारी घटना अमृतसरमधील खासगी रूग्णालयात घडली.
त्या रूग्णालयात ऑक्सिजन अभावी प्राणज्योत मालवलेल्या रूग्णांपैकी 5 जण करोनाबाधित होते. त्या दुर्घटनेवरून रूग्णालय प्रशासन आणि पंजाबच्या आरोग्य विभागामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. त्यानंतर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी संबंधित घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. दिल्लीत सलग दोन दिवस ऑक्सिजनअभावी रूग्ण दगावल्याच्या घटना घडल्या.
त्या दोन घटनांमध्ये 45 रूग्ण मृत्युमुखी पडले. त्याशिवाय, मध्यप्रदेशातही 5 करोनाबाधित ऑक्सिजनअभावी दगावले. त्यामुळे ऑक्सिजन तुटवड्याच्या समस्येला अतिशय गंभीर स्वरूप प्राप्त झाल्याचे सूचित होत आहे.