नगर (प्रतिनिधी) – नगर जिल्ह्यात कडक निर्बंध घालून दिलेले आहेत. मात्र, काही ठिकाणी निर्बंधांचे पालन होताना दिसत नाही. अजुनही लोक रस्त्यावर दिसत आहेत. त्यामुळे कायदा मोडणार्यांची गय करू नका, अशा सूचना राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज अधिकार्यांना दिल्या.
जिल्ह्यातील करोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी थोरात यांनी आज नगरला नियोजन भवनात बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी अधिकार्यांना सक्त सूचना केल्या. जिल्हाधिकारी डॉ. राआमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, महापालिका आयुक्त शंकर गोरे, जिल्हा शल्याचिकित्सक सुनील पोखरणा, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, वैद्यकीय आरोग्याधिकारी अनिल बोरगे व अन्य अधिकारी.
थोरात म्हणाले, ‘‘करोनाबाधित सर्वच रुग्णांना संस्थात्मक क्वारंटाइन केले पाहिजे. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून लक्षणे असणार्यांचे विलगीकरण करा. संगमनेरमध्ये याचा चांगला परिणाम झाला. करोनाबधितांची संख्या त्यामुळे घटत आहे. करोनाबाधित रुग्णांना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केल्यास केवळ औषधोपचारांनी रुग्ण बरा होत आहे. त्यातून रूग्णांना ऑक्सिजन, इंजेक्शनची गरज पडत नाही.’’
जिल्हा नियोजन मंडळातून नगरचे जिल्हा शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय कर्जत, पाथर्डी, संगमनेर व श्रीरामपूर येथे दररोज 250 जम्बो सिलिंडर क्षमतेचे ऑक्सिजन उत्पादन केंद्र उभारण्यात येत आहे, त्यामुळे जिल्ह्याला ऑक्सिजनचा अधिक पुरवठा होईल, असे ते म्हणाले. जिल्हा नियोजन मंडळ, आमदार निधीतून 100 पोर्टेबल ऑक्सिजन काँसेंट्रेटर मशीन जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांना पुरवण्याच्या सूचना यावेळी दिल्या.
नगर शहरात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्यादृष्टीने निर्बंध अधिक कडक करणे अत्यावश्यक आहे. कोविड केअर सेंटरमधील सुविधा वाढविण्यावर भर द्या. उपाययोजनांचा नियमित आढावा घ्यावा. जेथे मदत लागेल ते सांगा आम्ही मदत करू, अशासूचना त्यांनी केल्या. तसेच या संकटातून बोध घेऊन पुण्यातील ससून किंवा औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाच्या धर्तीवर नगर शहरात मोठे आरोग्य केंद्र उभारण्याच्या संदर्भाने अभ्यास करून जिल्हाधिकारी यांनी शासनास प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश थोरात यांनी दिले.
नगर : जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडून करोनास्थितीची माहिती घेताना राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात. समवेत आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, महापालिका आयुक्त शंकर गोरे, जिल्हा शल्याचिकित्सक सुनील पोखरणा, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, वैद्यकीय आरोग्याधिकारी अनिल बोरगे व अन्य अधिकारी. (छायाचित्र : राजू खरपुडे)