अरुण जेटली यांनी घेतलेले 6 धाडसी निर्णय

नवी दिल्ली : देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने 9 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आवश्‍यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, अरुण जेटली यांनी भारतीय अर्थव्यस्था भक्‍कम करण्यासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले होते. त्यात एका रात्रीतून घेतला गेलेला देशाच्या चलनाचा महत्वाचा निर्णय सर्वात अग्रस्थानी आहे. अरूण जेटली हे अर्थमंत्री असतानाच देशात नोटबंदीचा निर्णय लागू करण्यात आला होता. त्यानंतर वस्तू आणि सेवा कर प्रणालीचा निर्णय देखील त्यांच्याच काळात घेण्यात आला. या निर्णयामुळे देशातील अर्थव्यवस्थेत मोठे बदल झालेले पहायला मिळाले. यानंतर देशाचे अर्थमंत्री असताना त्यांनीच देशाचा अर्थसंकल्प आणि रेल्वेचा अर्थसंकल्प असे वेगळे असणारे दोन संकल्पाची संकल्पना रद्द करत देशाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात रेल्वेचा समावेश केला. तसेच देशाचा अर्थसंकल्प दरवर्षी 1 फेब्रुवारीच सादर करण्यात येणार असल्याचा महत्वपुर्ण आणि धाडसी निर्णय त्यांनी घेतला.

नोटबंदी : 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशाच्या अर्थव्यवस्थेत एका रात्रीतून मोठा बदल घडला तो म्हणजे नोटबंदीने. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 हजार आणि 500 च्या जुन्या नोटा रद्द करण्याची घोषणा केला. त्यावेळी अरुण जेटली अर्थमंत्री म्हणून काम करत होते. दरम्यान, या निर्णयामुळे देशातील काळापैसा बाहेर येण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, आरबीआयने या निर्णयाच्या घोषणेचा केवळ चार तास अगोदर याला मंजुरी दिली होती.

जनधन योजना : जनधन योजनेमुळे आज देशातील तब्बल 35.39 कोटी भारतीयांचे बॅंकेत खाते आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या या बॅंक खाते उघडण्याचा निर्णयदेखील अरूण जेटली यांच्याच काळात घेण्यात आला. ही योजना 2014 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि या योजनेच्या यशासाठी अरूण जेटलींचे योगदान मोठे होते कारण जेटलींच्या आर्थिक रणनितीमुळेच आज देशात ही योजना यशस्वी झाल्याचे पहायला मिळत आहे.

जीएसटी : जीएसटी म्हणजेच वस्तू व सेवा कर. या करप्रणालीनुसार एक राष्ट्र, एक कर असा नियम लागू करण्यात आला. परंतू, हा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेणे एवढे सोपे नव्हते. मागच्या काळातील सरकारने यावर केवळ चर्चा केली होती. परंतुश केवळ अरूण जेटली यांच्या धाडसामुळे जीएसटीचा निर्णय घेणे सरकारला जमले होते. जीएसटीची गाडी आज योग्य ट्रॅकवर आहे ते केवळ अरूण जेटली यांच्यामुळेच असे म्हणावे लागेल. कारण यासाठी अरूण जेटली यांनी प्रचंड मेहनत घेतली होती.

आयुष्यमान भारत : मोदी सरकारची आयुष्यमान भारत योजना ही एक मोठे यश असल्याचे मानले जाते. जगभरात या योजनेचे कौतूक होताना दिसते. मात्र या कौतूकाच्या मागे अरूण जेटली यांचे परिश्रम आहेत. अरूण जेटली यांनी 2018-19 चा अर्थसंकल्प सादर करताना या योजनेची घोषणा केली होती. याच योजनेने आता पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपासाठी संजीवनीचे काम केले. दरम्यान, या योजनेंतर्गत येणाऱ्या कुटूंबाला 5 लाखांपर्यंतची आरोग्य सुविधा सरकारकडून देण्यात येते. आतापर्यंत देशात 10 कोटी कुटूंबाला या योजनेचा मोठा फायदा झाला आहे. दरम्यान, या योजनेच्या यशाचे खरे श्रेय हे अरूण जेटली यांनाच जाते.

मुद्रा योजना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजक्‍ट असणारी मुद्रा योजना. या योजनेच्या सुरूवातीपासून ते ही योजना यशस्वी करण्यापर्यंत तत्कालिन अर्थमंत्रालयाचे मोठे योगदान असल्याचे पहायला मिळते. मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये या योजनेची सुरूवात झाली होती त्यावेळी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी या योजनेला यशस्वी करण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले होते. दरम्यान, आतापर्यंत देशातल्या 73 टक्‍के महिलांना या योजनेचा फायदा झाला असून याचा मुळ उद्देश महिलांना सक्षम करणे हाच आहे आणि अरूण जेटली यांच्या प्रयत्नाला आज यश आल्याचे दिसत आहे.

सुकन्या समृद्धी योजना : अरूण जेटली यांनी 2018-19 च्या आपला अर्थसंकल्पीय भाषणात या योजनेचा उल्लेख केला होता. 2015 मध्ये सुरू करण्यात आलेली योजना ही देशात यशस्वी झाल्याचे त्यावेळी जेटली यांनी म्हटले. तसेच आजही आपल्या मुलीच्या भविष्याच्या दृष्टीने ही योजना लोकांना उपयोगी पडत आहे याचे श्रेय अरूण जेटली यांनाच जाते. या योजनेंतर्गत आपल्या 10 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलीच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्यात येते. मुलगी वाचवा-मुलीला शिकवा या योजनेंतर्गत ही योजना सुरू करण्यात आली होती. दरम्यान, देशात आज ज्यांना या योजनेमुळे लाभ झाला आहे ते आज काय भविष्यात देखील अरुण जेटली यांना नक्‍कीच धन्यवाद देतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.