नवी दिल्ली : देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचा हैदराबाद दौरा रद्द केला आणि ते दिल्लीकडे रवाना झाले आहेत. काही वेळापूर्वीच एम्स रुग्णालयाने माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे निधन झाल्याचे जाहीर केले. एम्स रुग्णालयात 9 ऑगस्टपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना श्वसनाचा त्रास होत होता त्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात काम केले. भाजपाच्या जडणघडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. नोटाबंदीचा निर्णय असेल किंवा जीएसटीचा विषय असेल त्यासंदर्भातले महत्त्वाचे निर्णय अरुण जेटली यांनी घेतले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मला निवडणूक लढवायची नाही आणि कोणतेही पद मला देऊ नका हे त्यांनी स्वतः सांगितले होते. त्यांना श्वसनाचा त्रास गेल्या काही दिवसांपासून होत होता. त्यांची प्राणज्योत आज मालवली.