5 हजार 51 उमेदवारांना बाप्पा पावला

न्यायालयाच्या निर्णयामुळे शिक्षक भरतीतील उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याचा मार्ग मोकळा

पुणे – राज्यात “पवित्र पोर्टल’मार्फत मुलाखतीशिवाय निवड करण्यात आलेल्या शिक्षकांना नियुक्तीपत्र देण्याबाबतचा मार्ग उच्च न्यायालयाच्या निकालामुळे मोकळा झाला आहे. यामुळे उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप करण्यास सुरुवातही झाली आहे.

राज्यातील शिक्षकांची 12 हजार रिक्तपदे भरण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मुलाखतीशिवाय 9 हजार 80 पदे भरतीसाठी उपलब्ध करण्यात आली होती. यातील गुणवत्तेनुसार उमेदवारांना नोकरी देण्याबाबत 9 ऑगस्ट रोजी निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे.

या यादीत 5 हजार 822 उमेदवारांचा समावेश करण्यात आला होता. यात जिल्हा परिषद शाळांमध्ये 3 हजार 530, महापालिकेमध्ये 1 हजार 53, नगरपालिकेच्या 172, खासगी व्यवस्थापनाच्या पहिली ते आठवीच्या शाळांमध्ये 296 याप्रमाणे उमेदवारांना यादीत समावेश करण्यात आलेला आहे. 3 हजार 258 पदे अद्यापही रिक्तच राहिली आहेत.

निवड यादीतील उमेदवार त्या-त्या शाळांमध्ये कागदपत्रांची पडताळणी करून रुजू झाले आहेत. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात काही उमेदवारांचीच शिक्षक भरतीप्रक्रियेविरुद्ध याचिका दाखल केली होती. त्यामुळे उमेदवारांना नियुक्तपत्रे देण्यात अडथळा निर्माण झाला होता. शासनाच्या वतीने नियुक्तीपत्रे देण्यावरील स्थगिती उठविण्याबाबत अर्जही दाखल करण्यात आला होता. यावर न्यायालयात 28 ऑगस्ट रोजी सुनावणी झाली होती. त्याचा निर्णय नुकताच उपलब्ध झाला आहे. निवडयादीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्तपत्र वाटप करण्याचा शुभारंभ बुधवारी (दि.4) मुंबई येथे झाला. यावेळी शालेय शिक्षणमंत्री ऍड. आशिष शेलार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी आदी उपस्थित होते.

पुढील आदेशानुसार कार्यवाही
न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इयत्ता पहिली ते बारावी व खासगी संस्थांतील इयत्ता पहिली ते आठवीवरील शिक्षकांना नियुक्ती देता येणार आहे. त्यामुळे कागदपत्रे पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती प्राधिकारी यांचेकडून नियुक्ती आदेश देण्यास सुरुवात झाली आहे. खासगी संस्थांमधील इयत्ता नववी ते बारावी या गटातील 771 निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केल्यानंतर नियुक्तीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. ही माहती पवित्र पोर्टलवर उमेदवारांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here