पाथर्डी -आई वडील दारू प्यायला पैसे देत नाहीत, पण लहान भावालाच कसे पैसे देतात. याचा राग येऊन सख्ख्या मोठ्या भावाने झोपलेल्या लहान भावाच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून जागीच ठार केल्याची घटना तालुक्यातील फुंदे टाकळी येथे घडले आहे.निलेश विष्णू फुंदे (वय 26) असे मृत तरुणाचे नाव आहे.
सोमवार सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फुंदे टाकळी येथील खिळा वस्तीवर ही घटना घडली. वडील विष्णू काशिनाथ फुंदे (वय 65) यांनी मोठा मुलगा बाबाजी विष्णू फुंदे याचे विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी बाबाजीला ताब्यात घेतले आहे.
विष्णू फुंदे व त्यांची पत्नी चंद्रकला फुंदे टाकळी येथील खिळा वस्तीवर राहतात. त्यांना बाबाजी व निलेश अशी दोन मुले असून शेती व्यवसाय करून उपजीविका करतात. मोठा मुलगा बाबाजी दारू पिण्यासाठी वेळोवेळी पैसे मागत असे.पैसे मिळाले नाही की आई-वडिलांशी वाद घालत असे. लहान मुलगा निलेश हा वाद घालू नको म्हणून मोठ्या भावाला नेहमी समजावून सांगत असे. नेहमीच समजावून सांगतो, म्हणून बाबाजीला लहान भाऊ निलेशचा राग होता.
सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बाबाजीने दारू पिण्यासाठी आई-वडिलांकडे पैसे मागितले. मात्र त्याला पैसे दिले नाहीत. तुम्ही मला पैसे देत नाहीत, मात्र लहान भाऊ निलेशला नेहमीच पैसे देता. त्याला एकदाचा संपवूनच टाकतो असे म्हणत बाबाजीने घरातील कुऱ्हाड घेऊन झोपलेल्या लहान भावाच्या डोक्यात घाव घातला. कुऱ्हाडीच्या घावाने गंभीर जखमी झालेला निलेश जागीच बेशुद्ध झाला होता.
शेजाऱ्याच्या मदतीने त्याला पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परिस्थिती गंभीर असल्याचे पाहून त्याला अहमदनगरला खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच निलेश मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपी बाबाजीच्या विरोधात पाथर्डी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे पुढील तपास करत आहेत.