पुणे – बंदी असलेल्या गुटख्याचा साठा असलेल्या ठिकाणांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. जांबे (ता. मुळशी) येथील एका व्यक्तीच्या घरातून 49 लाख 75 हजार 500 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
महेंद्र नथुराम राठोड (जांबे ता. मुळशी) या व्यक्तीच्या घरातून गुटखा जप्त केला असून त्याच्याविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जनहित व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोणातून राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधित सुपारी आदी तबांखू जन्य पदार्थ्यांचे उत्पादन, साठा, वितरण, वाहतूक आणि विक्री यावर बंदी घातली आहे.
तरीही गुटख्याची विक्री होत असल्याचे दिसून आले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे कार्यालयाने जांबे येथील राठोड यांच्या घरावर छापा टाकून गुटखा जप्त केला. गुटख्याची पुन्हा विक्री होऊ नये म्हणून या दोन्ही खोल्या सिलबंद केल्या आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आली.
प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आदींच्या विक्रीबाबतची माहिती असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 किंवा कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी केले आहे.