कोलकता – पश्चिम बंगालच्या मंत्रिपदावरून हकालपट्टी झालेले पार्थ चटर्जी यांची निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी हिच्या दुसऱ्या फ्लॅटमध्ये सुमारे 28 कोटी रूपयांची रोकड आढळली. त्यामुळे अर्पिताच्या दोन फ्लॅटमध्ये मिळून तब्बल 50 कोटींची रोकड हाती आली आहे.
शिक्षक भरती घोटाळ्यावरून चटर्जी यांना अटक करण्यात आली. त्याशिवाय, चटर्जी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापासत्र सुरू केले. त्या कारवाईदरम्यान काही दिवसांपूर्वी अर्पिताच्या एका फ्लॅटमध्ये 21 कोटी रूपयांची रोकड सापडली. त्यानंतर अर्पितालाही अटक करण्यात आली.
तिने चौकशीवेळी दिलेल्या माहितीच्या आधारे तिच्या दुसऱ्या फ्लॅटवर बुधवारी छापा टाकण्यात आला. त्यावेळी आणखी रोकड हाती आली. त्याशिवाय, 5 किलो सोन्याचे दागिनेही हस्तगत करण्यात आले. संबंधित रोकड मोजण्याचे काम रात्रभर सुरू होते. अर्पिताने चौकशीवेळी कोलकता आणि इतरत्र असणाऱ्या मालमत्तांविषयी माहिती दिली. त्यामुळे ईडीचे छापासत्र आणखी काही दिवस चालण्याची शक्यता आहे. त्यातून आणखी घबाड सापडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.