नवी दिल्ली – वयाची 17 वर्ष पूर्ण झालेल्या युवकांना आता त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवण्यासाठी आगाऊ नोंदणीची सुविधा उपलब्ध असून त्यासाठी त्यांना 1 जानेवारी रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण असण्याच्या पात्रतेसाठी प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी, सहायक निवडणूक नोंदणी अधिकारी यांना यासंदर्भातील निर्देश दिले आहेत.
युवकांना, त्यांचे नाव नोंदणीचे अर्ज 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर या पात्रता तारखांच्या कालावधीत दाखल करता यावेत, त्यासाठी त्यांना 1 जानेवारीची प्रतीक्षा करायला लागू नये यादृष्टीने तंत्रज्ञानावर आधारित आवश्यक उपाय योजावेत असे निर्देश देण्यात आले आहेत.
सध्या अस्तित्वात असलेल्या धोरणानुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये,आगामी वर्षाच्या 1 जानेवारी या पात्रता तारखेच्या संदर्भात मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण किंवा पुनरीक्षण प्रत्येक वर्षाच्या साधारणपणे वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत केले जात होते.
जेणेकरून मतदार याद्यांचे अंतिम प्रकाशन येणाऱ्या वर्षाच्या जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात केले जात असे. आयोगाने आता मतदार नोंदणी अर्ज अधिक सोपा आणि सुलभ केला आहे. हा नवीन सुधारित अर्ज 1 ऑगस्ट 2022 पासून लागू होईल, 1 ऑगस्ट 2022 पूर्वी प्राप्त झालेल्या जुन्या स्वरूपातील सर्व अर्ज प्रक्रिया करून त्यांचा निपटारा केला जाईल आणि अशा प्रकरणांमध्ये नव्याने अर्ज दाखल करण्याची आवश्यकता असणार नाही.
यापुढे दर तिमाहीत मतदारयाद्या अद्ययावत केल्या जातील. त्यामुळे पात्र युवक-युवतींची नाव नोंदणी त्या वर्षाच्या पुढील तिमाहीत केली जाऊ शकते ज्यामध्ये त्याने/तिने 18 वर्षे पात्रता पूर्ण केली आहे.नाव नोंदणी केल्यानंतर त्याला / तिला एक मतदार ओळखपत्र दिले जाईल. 2023च्या मतदार यादीच्या वार्षिक पुनरिक्षणाच्या सध्याच्या फेरीसाठी, एक एप्रिल, एक जुलै आणि एक ऑक्टोबर 2023 पर्यंत 18 वर्षे पूर्ण करणारा कोणताही नागरिक मतदार यादीचे प्रारूप प्रकाशन प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून मतदार म्हणून नोंदणीसाठी आगाऊ अर्ज सादर करू शकतो.