ढाका – बांगलादेशाची राजधानी ढाकामधील गुलशन मार्केट परिसरातील एका हॉस्पिटलला लागलेल्या आगीत किमान 5 जणांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली. या हॉस्पिटलमध्ये करोना रुग्णांवर उपचार सुरू होते. ही आग रात्री 10 वाजण्याच्या सुर्मारास लागली. त्यानंतर अग्निशामक दलाला याबाबत कळवण्यात आले.
आगीवर लवकरच नियंत्रण मिळवण्यात आले मात्र आगीत 5 जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या 5 मृतदेहांपैकी चौघे पुरुष आहेत, तर एक महिलेचा मृतदेह मिळाला आहे, असे अग्निशमन सेवेचे ऑपरेशन डायरेक्टर लेफ्टनंट कर्नल झिलूर रहमान यांनी पत्रकारांना सांगितले.
तळ मजल्यावरील रुग्णालयाच्या कोरोना आयसोलेशन युनिटमध्ये आग लागली, असे गुलशन परिक्षेत्राचे पोलिस प्रभारी एस.एम. कामरुझामा यांनी सांगितले. या आगीचे नेमके कारण कळू शकले नाही, परंतु वातानुकूलन यंत्रणेच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीमुळे पाच जणांचा मृत्यू झाला, असे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. मरण पावलेले कोविड-19 चे रुग्ण होते की नाही, हे स्पष्टपणे समजू शकलेले नाही. या मयत व्यक्तींची ओळख पटवणे सुरू आहे.