अंकारा – तुर्कीयेतील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारताच्यावतीने पाठवण्यात आलेले मदत साहित्याचे चौथे विमान तुर्कीयेमध्ये दाखल झाले आहे. भारतीय हवाई दलाच्या सी-17 विमानातून मदत सामुग्री तुर्कीयेकडे रवाना करण्यात आली आणि अदाना विमानतळावर ते पोचले आहे.
या मदतसाहित्यामध्ये फिल्डवरील रुग्णालयाचे सुटे भाग देखील आहेत. याशिवाय भारतीय हवाई दलाच्या वैद्यकीय पथकातील कर्मचारी आणि वैद्यकीय सुविधेसाठी अन्य कर्मचारी आणि वैद्यकीय उपकरणांचाही समावेश आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
भारताच्यावतीने तुर्कीयेमध्ये मदत साहित्य आणि बचाव कर्मचाऱ्यांचे चौथे विमान पाठवले गेले आहे. यामध्ये “एनडीआरएफ’च्या 50 जवानांचे पथक, जखमींचा शोध घेण्यासाठी श्वानपथक आणि वैद्यकीय उपचारांसाठी हवाई दलाच्या वैद्यकीय पथकातील 54 सदस्यांच्या पथकाचाही समावेश आहे.
यापुढच्या काळात तुर्कीयेला अधिक मदत साहित्य आणि बचाव पथकातील कर्मचाऱ्यांची मदत देण्यात येईल, असेही परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. “वसुधैव कुटुंबकम’ हे भारताचे धोरण आहे. बदलत्या भूराजकीय समिकरणांचा परिणाम भारताच्या या धोरणावर होऊ दिला जाणार नाही, असेही जयशंकर यांनी म्हटले आहे.