हाताया : तुर्की आणि सिरिया पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरल्याची घटना समोर आली आहे. तुर्की आणि सीरीया देशाच्या सीमेवर आणखी एक भूकंप झाला आहे. हा भूकंप 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा असल्याचे सांगण्यात येत आहे. तुर्कीच्या हाते प्रांतात भूकंपाचे धक्के बसले. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जण जखमी आहेत.
अनादोलु एजेन्सीने या दुर्घटनेविषयी माहिती दिली आहे. तुर्कीच्या हाते प्रांतात भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपात तीन जणांचा मृत्यू झाला असून 213 जण जखमी झाले आहे. राष्ट्रपती रेसेप तईप एर्दोगन यांनी सोमवारी हाते प्रांताचा दौरा केला. सरकार पुढील महिन्यात भूकंपग्रस्त भागात जवळपास दोन लाख घरांचे काम तातडीने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
14 दिवसांनतर आलेल्या या भूकंपामध्ये अनेक इमारती कोसळल्या आहेत. भूकंपानंतर मदत आणि बचाव पथकाने भूंकपग्रस्त भागाकडे धाव घेतली असून अजूनही बचावकार्य सुरू आहे. 14 दिवसांपूर्वी जेव्हा भूकंप आला त्यावेळी अनेक इमारतींना तडे गेले होते. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की, दोन्ही देशातील शेकडो इमारती कोसळल्या होत्या.
अनेकजणांची कुटुंब रस्त्यावर आली आहेत. काहींची घरं जमीनदोस्त झाली तर अनेकांचा संसार उद्ध्वस्त झाला. अशा इमारतींना धोकादायक इमारती म्हणून घोषीत केले होते. धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना रिलीफ कॅम्पमध्ये पाठवण्यात आले. भूकंप झालेल्या ठिकाणी मदतकार्य सुरू असून मृतांच्या आकड्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.