गाझियांतेप (तुर्कीये) – सीरिया आणि तुर्कीये या दोन्ही भूप्रदेशांमध्ये मदतीचा ओघ वाढू लागला आहे. मदत आणि बचावकार्यासाठी शेकडो स्वयंसेवी संस्था आणि सरकारी यंत्रणा कार्यरत झाल्या आहेत. या सीमाभागात झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता 11000 च्या पुढे गेली आहे. त्यामुळे हा भूकंप 2011 पासूनचा सर्वात भीषण भूकंप ठरला आहे. 2011 मध्ये जपानमध्ये झालेल्या भूकंप आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामी लाटांच्या तडाख्यात 20 हजार लोकांचा बळी गेला होता.
भूकंपात झालेल्या प्रचंड वित्त आणि जीवितहानीचे स्वरूप बघून तुर्कीयेचे अध्यक्ष इर्दोगन यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला मदतीचे आवाहन केले आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या पाझारसिक येथे आणि भूकंपाचा सर्वाधिक फटका बसलेल्या हेताय प्रांताला ते आज भेट देणार आहेत.
तुर्कीयेमध्ये भूकंपग्रस्त भागामध्ये सुमारे 60 हजार कर्मचारी मदत कार्यात गुंतले आहेत. मात्र तरीही अजून शेकडो जणांपर्यंत मदत पोहोचू शकलेली नाही. भूकंपाला दोन दिवस होऊन गेल्यानंतर तुर्कीये आणि सीरिया या दोन्ही देशांमधील शेकडो जणांना इमारतींच्या ढिगाऱ्यांखालून बाहेर काढले आहे. तर अनेक जणांचे मृतदेह बाहेर काढले गेले आहेत.
ढिगाऱ्यांखालून अनेकांना सुखरूपपणे बाहेर काढत असताना इमारतींचे अन्य अवशेष पुन्हा कोसळणार नाहीत, याची काळजी देखील बचाव पथकातील कर्मचाऱ्यांना घ्यावी लागली. या बचाव आणि मदतकार्यासाठी सुमारे दोन डझन देशातील मदत कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. आणखीन इतर आंतरराष्ट्रीय संस्थांनीही मदत आणि बचावकार्यात सहभागी होण्याचे आश्वासन दिले आहे. तुर्कीतील शेकडो जणांना कारमध्ये आणि सरकारी छावण्यांमध्ये मुक्काम करावा लागला. मदतीसाठीचे तंबू जून भूकंपपीडितांपर्यंत पोहोचले नसल्यामुळे थंडीचा सामना करावा लागतो आहे.
सीरियामध्ये भूकंपामुळे हजारो इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. 12 वर्षांपेक्षा अधिक काळापासून सुरू असलेल्या यादवी युद्धामुळे विस्थापित व्हावे लागलेल्यांना आणखीन मोठ्या आपत्तीला सामोरे जावे लागते आहे. भूकंपात मरण पावलेल्या एका मातेच्या कुशीमध्ये एक नवजात बालक रडत असल्याचे बचाव पथकातील कार्यकर्त्यांना समजले. या बालकाच्या आवाजाच्या आधारे त्याला शोधून काढून ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले.
China’s second spy balloon : चीनचा दुसरा टेहळणी बलून अमेरिकेला सापडेना
भूकंपाचा फटका 23 दशलक्ष नागरिकांना
या विनाशकारी भूकंपाचा फटका तब्बल 23 दशलक्ष नागरिकांना बसला आहे, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. आतापर्यंत अनेक शहरांमध्ये झालेल्या मोठ्या आपत्तींमधील सर्वात मोठी आणि भीषण आपत्ती असे वर्णन जागतिक आरोग्य संघटनेचे वरिष्ठ आपत्कालीन अधिकारी आर्टेल्हेड मार्सचॅंग यांनी केले आहे.
#RussiaUkraineWar : युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी अचानक ब्रिटनच्या दौऱ्यावर; तातडीने महत्वाची शस्त्रे…
3 वर्षाच्या बालकाची सुखरूप सुटका
मदत आणि बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी इमारतीच्या ढिगाऱ्याखालून 3 वर्षाच्या एका बालकाची सुखरूप सुटका केली. भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून जवळच असलेल्या काहरामानमारास शहरातील एका इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आरिफ कान या बालकाला वाचवण्यात आले. या मुलाच्या कमरेवर कॉंक्रिटचा खांब पडला होता. गोठवणाऱ्या थंडीमध्ये हा मुलगा दोन रात्री त्याच अवस्थेत पडून राहिला होता. त्याच्या अंगावर पडलेला खांब फोडून मुलाची सुटका केली गेली.