सागर व आकाशातील अनुचित प्रकार रोखण्यासाठी अमेरिका-रशिया करार
मॉस्को, ता. 25 – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांच्या वाटाघाटी रशियन नेत्यांशी चालू आहेत. आज रशिया-अमेरिका यांच्यादरम्यान पाचव्या करारावर सह्या झाल्या. सागरांत आणि अवकाशात होणारे अनुचित प्रकार टाळण्याचा प्रयत्न या करारानुसार होणार आहे. अध्यक्ष निक्सन यांनी आज रशियाचे अध्यक्ष निकोलाय पॉडगार्डी व पंतप्रधान कोसिजिन यांच्याशी वाटाघाटी केल्या.
रशियन ज्ञानकोशात चुकीच्या भारत सीमा
नवी दिल्ली – ग्रेट सोव्हिएत एन्साक्लोपिडियामध्ये भारतीय सीमा चुकीच्या दाखविल्या आहेत. त्या दुरुस्त कराव्यात असाही सतत प्रयत्न करीत आहे, असे विदेशमंत्री स्वर्णसिंग यांनी लोकसभेत सांगितले.
शिखर वाटाघाटीत काश्मीर प्रश्नास प्राधान्य राहील
नवी दिल्ली – “येत्या जूनच्या अखेरीस पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी नव्या दिल्लीत आपण बोलणी करणार आहोत. या वाटाघाटीच्या वेळी ज्या महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा होईल त्यात काश्मीरचा प्रश्न हा प्रमुख असेल,’ असे पाकिस्तानचे अध्यक्ष जनाब झेड. ए. भुट्टो यांनी आज सांगितले.
जनाब भुट्टो यांनी आज प्रथमच शिखर वाटाघाटींची तारीख सूचित केली. “नव्या दिल्लीतील वाटाघाटीच्या वेळी मी जी भूमिका घेणार आहे ती पाकिस्तानी जनतेच्या मताचा कौल पाहून ठरविणार आहे’, असेही भुट्टो म्हणाले.
मूलभूत हक्क देण्यास भुट्टो तयार नाहीत
नवी दिल्ली – देशातील परिस्थिती बिकट असल्याने पाकिस्तानी जनतेस मूलभूत हक्क देण्याची शक्यता जनाब भुट्टो यांनी नाकारली. पत्रकारांशी बोलताना भुट्टो म्हणाले, युद्ध आणि आणीबाणी चालूच आहे.