पुणे – पालिका हद्दीत वास्तव्य असणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी क्रीडा विभागाकडे 49 अर्ज आले आहेत. त्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. महापालिकेच्या सुधारित क्रीडा धोरणात ही तरतूद करण्यात आली आहे. त्या अंतर्गत अर्ज मागविण्यात आले होते.
तरतुदीनुसार, विविध खेळांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळविणाऱ्या व क्रीडा क्षेत्रात अत्युच्च कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना महापालिकेकडून शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. पालिका हद्दीमध्ये वास्तव्य असून या खेळाडूंना महाराष्ट्र शासनाकडून शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार असून त्यासाठी पुरस्कार 2014 पासूनच्या पुरस्कार विजेत्यांकडून महापालिकेने लेखी अर्ज मागविण्यात आले होते. शासनाने मागील 2 वर्षांमध्ये 4 वर्षांचे पुरस्कार जाहीर केले आहेत. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाकडून सन 14-15, 15 -16, 16-17, 18-19 या कालावधीमध्ये ज्या खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी महापालिकडे लेखी अर्ज करण्यासाठी जाहीर निवेदन देण्यात होते. त्यानुसार, या वर्षांमध्ये शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त केलेल्या खेळाडूंनी त्यांचे लेखी अर्जासोबत शिवछत्रपती पुरस्कार प्रमाणपत्र, आधारकार्ड, पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये वास्तव्यास असल्याचा पुरावा तसेच साक्षांकित प्रती महापालिकेच्या क्रीडा विभागात सादर करव्यात तसेच ही कागदपत्रे सादर करण्यासाठी 12 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या मुदतीत सुमारे 49 अर्ज क्रीडा विभागाला प्राप्त झाले असून त्यात 30 पुरुष तर 19 अर्ज हे महिला खेळाडूंचे असल्याचे क्रीडा विभागाकडून सांगण्यात आले.