शक्य तेवढी खर्चात काटकसर करा व इतरांना उदाहरण घालून द्या
पुणे, ता. 2 – पंतप्रधान इंदिरा गांधींनी आपल्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना असा आदेश दिला आहे की, त्यांनी आपापल्या खात्यात जेवढी काटकसर करता येईल तितकी करावी व जनतेला उदाहरण घालून द्यावे.
या सूचना अशा –
1) सरकारी स्वागत समारंभ अगदी थोडे व तेही परदेशी पाहुण्यापुरतेच मर्यादित असावेत.
2) सरकारी मोटारीचा वापर सरकारी कामापुरताच करावा. 3) टेलिफोनचा वापर प्रत्यक्ष मंत्र्यांपुरताच मर्यादित ठेवावा.
4) प्रवास फक्त सरकारी कामकाजापुरता मर्यादित ठेवावा. 5) परदेशी प्रवास शक्यतो टाळावा.
6) बंगल्याची दुरुस्ती, फर्निचर यांचेवर फार खर्च करू नये. 7) तातडीचे खर्च अगदी जरूरीपुरतेच करावे.
8) वीज वापरात अत्यंत काटकसर करावी.
गॅस वजन करून घ्या
पुणे – गॅस सिलेंडर देताना गॅस एजंटांनी तो वजनाचे काट्यावर वजन करून दिला पाहिजे. अशा सरकारी हुकुमाकडे जीवनोपयोगी वस्तू ग्राहक संघाचे अध्यक्ष हरिभाऊ गद्रे यांनी गॅस एजंटांचे लक्ष वेधले आहे. हल्ली सिलेंडर लवकर संपतो. अशा नागरिकांच्या तक्रारी आल्याने सिलेंडरमध्ये गॅस बरोबर भरला जात नसावा अशी शंका गद्रे यांनी उपस्थित केली होती. गॅस सिलेंडर वजन करून दिला नाही तर इंडस्ट्रिज इन्स्पेक्टर (वजन काटे) यांचेकडे तक्रार करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
पेन्शनरांना खूशखबर
पेन्शन सरकारी खर्चाने घरपोच मिळेल
नवी दिल्ली – ज्यांचे पेन्शन 100 रुपयांच्या आत आहे अशा सर्व पेन्शनरांना त्यांचे पेन्शन सरकारी खर्चाने त्यांचे घरी मनीऑर्डरने पाठविण्यात येईल, असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. त्यात सैनिक व संरक्षण खात्यातील मुलकी नोकरांचाही समावेश आहे. यासाठी पेन्शनरांनी पेन्शन वाटप अधिकाऱ्याकडे अर्ज करावयाचा आहे.