चीन-फ्रान्सच्या स्नेहसंबंधात आता नवे युग निर्माण झाले
टोकियो, ता. 17 – चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे उपाध्यक्ष वांग हूंग वेन यांनी फ्रान्सचे अध्यक्ष जॉर्ज पॉम्पिदू यांना असे सांगितले की, त्यांच्या चीन भेटीमुळे दोन्ही देशांच्या स्नेहसंबंधात नवे युग सुरू झाले आहे. दोन्ही देशात आर्थिक, विज्ञान, तंत्रविषयक व सांस्कृतिक देवघेवीमुळे हे स्नेहसंबंध अधिकच दृढ होतील असे वांग यांनी सांगितले.
चिलीबद्दल जगभर निषेध व्हावा
मेक्सिको सिटी – चिलीमध्ये जे काही घडले त्याविरुद्ध जगभर निषेध व्यक्त झाला पाहिजे, असे मत मिसेस सालव्हॉडॉर ऍलेदे (आत्महत्या केलेले चिलीच्या अध्यक्षांची पत्नी) यांनी आज येथे व्यक्त केले. त्या पुढे म्हणाल्या, चिलीमध्ये फॅसिझमने सत्तास्थान बळकावले आहे. त्या लष्करी सत्तेविरुद्ध जोराचा प्रतिकार निर्माण केला पाहिजे.
देशात भरपूर अन्नधान्य आहे
नवी दिल्ली – देशाची गरज भागेल एवढे पुरेसे धान्य देशात असून धान्य परिस्थितीविषयी निराश होण्याचे कारण नाही, असे मत केंद्रीय शेती मंत्री फकरुद्दीन अली अहमद यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या परिषदेचे उद्घाटन करताना व्यक्त केले.
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सार्वमत घ्या
मद्रास – अण्णा द्रमुक पक्षाचे नेते रामचंद्रन यांनी मुख्यमंत्री करुणानिधी यांना असे आव्हान दिले आहे की, त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर राज्यात सार्वमत घ्यावे. भ्रष्टाचारी द्रमुक सरकार लोकांना हवे आहे की नाही ते ठरविण्याचा हाच एक लोकशाही मार्ग आहे, असे ते म्हणाले.
बांगला देशाचे यूनोतील सभासदत्व
डाक्का – बांगला देशचे सरकार यूनोत प्रवेश मिळवण्यासाठी पुन्हा मोहीम सुरू करणार असे कळते. त्यासाठी सुरक्षा समितीच्या कायम सभासदांकडे एक अर्ज करण्यात येईल. गेल्या वर्षाचा अर्ज या सदस्यांकडे अद्याप पडून आहे.