तिसरे जागतिक युद्ध सुरू होण्याचा धोका फार वाढला
तेहरान, दि. 17 – बडी राष्ट्रे पश्चिम आशियातील युद्धात पडण्याची शक्यता आहे, असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान झेड. ए. भूट्टो यांनी येथे इराणच्या शाहशी बोलणी केल्यानंतर व्यक्त केले. बड्या राष्ट्रांच्या हस्तक्षेपामुळे पश्चिम आशियातील परिस्थिती गंभीर स्वरूप धारण करण्याची
शक्यता आहे. पाकिस्तान पश्चिम आशियात लष्कर पाठविणार नाही पण वैद्यकीय मदत मात्र पाठवील. जर ह्या युद्धाची व्याप्ती वाढली तर सर्व जगच या पश्चिम आशियायी युद्धात गुंतले जाते की काय अशी भीती वाटते.
क्रूड ऑइलचे दर 17 टक्क्यांनी वाढविले
कुवेत – पर्शियन आखातातील तेल उत्पादक देशांनी क्रूड ऑइलच्या किमतीत 17 टक्के वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. या दरवाढीस प. आशियातील युद्ध कारणीभूत नाही असे सांगण्यात आले.
पुणे शहरात भूकंपाचे धक्के जाणवले
पुणे – पुणे वेधशाळेने आज रात्री 8.53 वा. भूकंपाच्या सौम्य धक्क्याची नोंद केली. 1.5 तीव्रतेच्या या धक्क्याचे केंद्र कोयना धरणाच्या परिसरात होते. पुन्हा धक्का बसण्याच्या अफवांमुळे कसबा इ. पूर्व भागातून लोक बराच वेळ घराबाहेर बसून राहिले. 9 वा. पाचगणीला भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला. छोटे धक्के बसल्याच्या बातम्या धरणानजीकच्या कराड, सातारा, सांगली, कोल्हापूर भागातून आल्या.
थो यांनी नोबेल पारितोषिक ठोकरले!
पॅरिस – उत्तर व्हिएतनामचे कम्युनिस्ट राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य मिले डक थो यांनी त्यांना देऊ करण्यात आलेले नोबेल पारितोषिक स्वीकारण्यास नकार दिला आहे. डॉ. किसिंजर यांच्या जोडीने शांततावादी म्हणून त्यांना संबोधणे त्यांना अयोग्य वाटते, असे समजते.