रशिया-अमेरिका शिखर परिषदेवर “वॉटरगेट’चे सावट?
मॉस्को, ता. 6 – अमेरिकेत वॉटरगेट प्रकरण उत्पन्न झाल्यामुळे रशिया व अमेरिका यांची जी शिखर परिषद भरणार आहे तिजवर लष्करी डावपेचाच्या दृष्टीने अनिष्ट परिणाम होणार आहेत. निक्सन विरुद्ध जो गदारोळ अमेरिकेत चालू आहे त्याचा फायदा रशिया घेतल्यावाचून राहणार नाही असे रशियाचे एक प्रमुख अधिकारी म्हटल्याचे समजते.
अर्थात हा अधिकारी पुढे म्हणाला, रशियन कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस अमेरिकेला लवकरच भेट देणार आहेत म्हणून तूर्त निक्सन संबंधी काहीही टीका रशिया करणार नाही. वाटाघाटींच्या वेळीही निक्सन यांना रशिया सहानुभूती दाखवील. शेवटचा एक मुद्दा राहिला तो म्हणजे, चीन व अमेरिकेचे संबंध दृढ होत चालले आहेत. ते तरी शिथिल करावेत असाही रशिया प्रयत्न करील.
देशभर एक दिवस “सिनेमा बंद’ करण्याचा निर्णय
मुंबई – चित्रपट व्यवसायाच्या अडचणी प्रकाशात याव्यात म्हणून लवकरच देशभर “सिनेमा बंद’ करण्याचा निर्णय आज येथे चित्रपट निर्माते, वितरक व प्रदर्शक यांच्या बैठकीत घेण्यात आला.
पाकिस्तान रणगाडेव लष्करी विमाने तयार करणार
नवी दिल्ली – “पाकिस्तानातच रणगाडे व लष्करी विमाने तयार करण्याची योजना पाकिस्तान तयार करीत आहे, अशी बातमी आज पाकिस्तान रेडिओवरून सांगण्यात आली. दळणवळण मंत्री गुलाम मुस्तफा जतोई यांनी ही माहिती आज पाकिस्तान नॅशनल असेंब्लीत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितली.
अबब, केवढे हे प्रचंड ऑमलेट!
नवी दिल्ली – मि. टोनी स्टोपानी यांनी पाकशास्त्रातील एक उच्चांक मोडला आहे. त्यांनी 5600 अंड्यांचे एक प्रचंड ऑमलेट तयार केले. सरे परगण्यात एका प्रदर्शनात त्यांनी हे ऑमलेट बनविले. हे ऑमलेट तयार करण्यासाठी त्यांनी 7 फूट रुंदीचे व 1 फूट खोलीचे एक तव्यासारखे भांडे उपयोगात आणले होते. या अंड्यांची किंमत 300 पौंड इतकी झाली.