सिक्कीममध्ये लोकशाही तत्त्वावर शिक्षण पद्धती
गंगटोक, दि. 14 – सिक्कीममध्ये लोकशाही तत्त्वावर शिक्षण पद्धत सुरू करण्यासाठी सरकारने योग्य पावले उचलली असून त्याचा फायदा समाजातील अत्यंत गरीब घटकांतील विद्यार्थ्यांना
होईल, असे मुख्यमंत्री काझी लेधुप डोरजी यांनी सांगितले. राज्यात ठिकठिकाणी नव्याने शाळा सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला असून प्रौढ शिक्षणासाठी प्रयत्न केले जाणार.
धूम्रपान सोडण्यासाठी नवी गोळी
मॉस्को – धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना तीन आठवड्यांमध्ये धूम्रपानाचे व्यसन सोडावयास मदत करणारी एक गोळी रशियन शास्त्रज्ञांनी तयार केली आहे. तिचे यशस्वी प्रयोगही करण्यात आले आहे. निकोटीन विरोधी कार्य करणारे हे औषध आहे.
चित्रपटगृहांचे सरकारीकरण
मद्रास – तामीळनाडू सरकार राज्यातील सर्व चित्रपटगृहे ताब्यात घेण्याचा विचार करीत आहे, असे हरिजन कल्याण खाते मंत्री राजंगम् यांनी आज विधानसभेत सांगितले.
लग्ने ठरवा नाहीतर राहायला घरे द्या!
अमृतसर – आमची लग्ने ठरवा, नाहीतर आम्हा ब्रह्मचाऱ्यांसाठी वेगळी वसाहत द्या, अशी मागणी आज येथील काही ब्रह्मचाऱ्यांनी अर्थमंत्री हंसराज शर्मा यांच्याकडे केली. येथील कोठलाही घरमालक ब्रह्मचाऱ्यांना घर भाड्याने अथवा विकत देत नाही, अशीही तक्रार त्यांनी केली.
ही मागणी ऐकताच मंत्री महाशय हसले. या मागणीचा जरूर विचार करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. बेघरांना घरे देण्याच्या योजनेच्या एका कार्यक्रमासाठी अर्थमंत्री महाशय येथे आले होते. त्यावेळी हा अनपेक्षित किस्सा घडला.