- मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द
पिंपरी – करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वच स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी राज्य सरकारला मदतीचा हात दिला आहे. सर्व नगरसेवकांचे मार्च महिन्याचे संपूर्ण मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आले आहे. या निधीचा धनादेश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे व विरोधी पक्षनेते नाना काटे उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 38 नगरसेवक आहेत. तर शिवसेनेचे 9 आणि मनसेचे एक अशा एकूण 48 नगरसेवकांनी आपले एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले आहे. यासंदर्भात बोलताना विरोधी पक्षनेते नाना काटे म्हणाले, करोना विरोधातील लढ्यात राज्य सरकार योग्य त्या उपाययोजना करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शहरावर बारकाईने लक्ष असून शहरातील करोना परिस्थितीबाबत त्यांच्याकडून दररोज विचारपूस केली जात आहे. शासनाला मदतीचा हात देण्यासाठी आम्ही हा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला आहे.