कोकणीला साहित्य अकादमीने मान्यता दिल्याने गोव्यातील शांतता नष्ट होईल
नवी दिल्ली, दि. 2 – कोकणी भाषेला साहित्य अकादमीच्या जनरल कौन्सिलने मान्यता दिली असून गोमांतक मराठी भाषा परिषदेने गोव्यातील शांतता नष्ट होईल, असा इशारा दिला आहे.
कोकणी ही बोलीभाषा
गोमांतक मराठी भाषा परिषदेने एका ठरावाद्वारे साहित्य अकादमीला कळविले आहे की, कोकणी भाषेला मान्यता देणे हे गोव्याच्या जनतेच्या इच्छेविरुद्ध होईल. गोव्यातील जनतेची मराठी ही भाषा असून कोकणी ही बोलीभाषा आहे.
600 वर्षांची परंपरा
गोव्यात मराठी भाषेची परंपरा गेली 600 वर्षे चालू आहे. पोर्तुगीजांची 450 वर्षांची राजवट झाली तरी ही परंपरा चालूच राहिली आहे. पोर्तुगीज अंमलात मराठीने गोव्यात राष्ट्रवाद जागृत ठेवला. आता केवळ मराठीच गोव्याला राष्ट्रवादाच्या मुख्य प्रवाहाशी एकरूप करू शकेल.
भारत-इराक सहकार्य करार
नवी दिल्ली – परस्परांच्या देशात वैज्ञानिक व संशोधक पाठविण्याच्या आणि कृषि व प्राणीशास्त्रे यात संयुक्त संशोधने करण्याच्या एका करारावर आज भारत व इराक यांच्या प्रतिनिधींनी सह्या केल्या. या कराराच्या दृष्टीने काय प्रगती झाली आहे त्याचा आढावा घेण्यासाठी एक संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असून एकाआड एक वर्षी नवी दिल्ली व बगदाद येथे बैठका होतील.
चित्रपटांची चोरटी आयात
मद्रास – देशात गुन्हेगारीवरील व लैंगिक विषयावरील रोमांचकारी चित्रपटांची चोरटी आयात होत असल्याचे उघडकीस आले असून एक अंदाज असा आहे की, दरवर्षी असे सुमारे 50 चित्रपट आयात होतात. अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे की, जर अशी चोरटी आयात चालू राहिली तर स्वदेशी चित्रपटांना गंभीर धोका पोहोचण्याचा संभव आहे. बांगड्या तयार करण्यासाठी निरुपयोगी फिल्म लागते. अशा फिल्मची आयात करण्यास बांगडी-उद्योगचालकांना परवानगी असते. याचा फायदा स्मगलर्स घेतात व निरुपयोगी फिल्मच्या नावाखाली या चित्रपटांची चोरटी आयात होते.