ता. 22, माहे मार्च, सन 1975
नवी दिल्ली – डिसेंबर 1974 ते 15 मार्च 1975 या अवघ्या तीन महिन्यांच्या कालखंडात पाकिस्तानने 14 वेळा भारतीय सीमेचे उल्लंघन केले असून पाक फौजांनी आठ वेळा गोळीबारही केल्याची माहिती संरक्षणमंत्री स्वर्णसिंग यांनी राज्यसभेत सांगितले. स्वर्णसिंग पुढे म्हणाले, चीनने पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर लष्करी साधनसामग्री पुरवली आहे. त्यात रणगाडे, तोफा, गनबोट्स, विमानविरोधी तोफा, हेलिकॉप्टर्स, विमाने, टोर्पेडो बोट्स यांचा समावेश आहे. पाकिस्तानने भारतविरोधी प्रचाराची चढी पट्टी लावली असल्याचे लक्षात आले असून पाकिस्तानी नेत्यांनीही भारतविरोधी संघर्षात्मक विधाने केली आहेत, असेही मत स्वर्णसिंग यांनी मांडले.
दंतविकारावर नवी शस्त्रक्रिया
मिरज – चांदी भरणे अशक्य असलेले किडके दात आरोग्यास अपायकारक होऊ नयेत म्हणून काढावे लागतात. परंतु आता असे दात मुळातून उपटून त्यात चांदी अथवा तत्सम पदार्थ भरून ते परत बसविता येतात. या शस्त्रक्रियेस अवघी 45 मिनिटे लागत असून दात पूर्वीप्रमाणे कार्यक्षम बनतात. या प्रकारची शस्त्रक्रिया भारतात थोड्या ठिकाणी केली जाते.
उत्पादनवाढीसाठी पाण्याचा योग्य तो वापर करा
बीड – देशातील अन्नधान्य परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा थेंब न थेंब वापरून उत्पादन वाढविले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी केले. मुख्यमंत्री म्हणाले की, जायकवाडी धरणाच्या परिसरातील शेतकऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपले शेतीचे उत्पादन वाढविले पाहिजे.