अणुस्फोटांच्या तीव्रतेवर मर्यादाःरशिया-अमेरिका करार
वॉशिंग्टन – शांततामय हेतूंसाठी करण्यात येणाऱ्या अणुस्फोटांच्या तीव्रतेवर मर्यादा घालण्यासंबंधीच्या एका करारावर आज येथे अमेरिकेचे अध्यक्ष फोर्ड यांनी व मॉस्कोमध्ये सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस ब्रेझनेव्ह यांनी सह्या केल्या. या प्रसंगी अमेरिकेचे अध्यक्ष फोर्ड म्हणाले, की जगात अधिक शांतता, अधिक स्थैर्य आणण्याच्या व रशिया-अमेरिका संबंध अधिक रचनात्मकपणे वाढविण्याच्या दृष्टीने हा करार म्हणजे एक महत्त्वाचे पाऊल आहे. रशियाकडूनही या कराराचे स्वागत करण्यात आले आहे.
भारताला 170 कोटी डॉलर्स मदत मिळणार
पॅरिस – भारताला 1976-77 सालासाठी 170 कोटी डॉलर्सचे साहाय्य करण्याचा निर्णय भारत साहाय्यक संघाने घेतला आहे. यातील काही मदत अनुदानरूपाने असेल. यापैकी 100 कोटी डॉलर्स मदत विविध देशांकडून मिळणार आहे, तर 70 कोटी डॉलर्सची मदत जागतिक बॅंकेकडून मिळणार आहे. या मदतीत 16 कोटी डॉलर्स कर्जमुक्तीसाठी म्हणून दिले जाणार आहेत. भारत साहाय्यक संघात 13 देश व जागतिक बॅंकेच्या 6 संस्थांचा समावेश आहे. 6.1 कोटी डॉलर्स मदतीचा आणखी एक करार होणार आहे.