पुणे- वनाझ ते गरवारे महाविद्यालय स्टेशन आणि पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी मेट्रो स्टेशन या मार्गाला जोडणारी बससेवा पीएमपीने सुरू केली आहे. 6 मार्गांवर सोमवारपासून ही सेवा सुरू झाली असून, आसपासच्या नागरिकांना मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचता येणार आहे.
शहरातील वनाझ ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या मार्गांवर मेट्रो धावण्यास सुरुवात झाली आहे. या स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने 6 मार्गांवर शटल सेवा सुरू झाली असून, मिडी बसेस सोडण्यात येणार आहेत. गरवारे मेट्रो स्टेशन येथे या सेवेचे उद्घाटन झाले. यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रीजेश दीक्षित, पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरूरे आदी उपस्थित होते.
या वर्तुळ मार्गांवर धावणार बसेस
गरवारे मेट्रो स्टेशन, नळस्टॉप मेट्रो स्टेशन आणि पिंपरी-चिंचवड मनपा मेट्रो स्टेशन, नाशिक फाटा (भोसरी) मेट्रो स्टेशन, फुगेवाडी मेट्रो स्टेशनहून दर 40 मिनिटांनी बसेस धावतील. तर संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनहून दर 35 मिनिटांनी बसेस सुटणार आहेत. मेट्रोस्थानकापासून सुटणाऱ्या या बसेसचे वर्तुळ मार्गावर संचलन होणार असून, मेट्रो स्थानकापर्यंत बसेस धावतील.