सातारा -खटाव-माणचे आक्रमक आमदार जयकुमार गोरे यांची भाजपच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत सोमवारी याबाबत घोषणा केली. मावळते जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांना प्रदेश सचिवपदावर बढती देण्यात आली आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि पालिकांच्या आगामी निवडणुका समोर ठेवून पक्षात संघटनात्मक बदल करण्यात आल्याचे प्रदेश कार्यकारिणीच्या सूत्रांनी सांगितले. आ. जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून जिल्ह्यात पक्षाचा राजकीय दबदबा कायम ठेवला आहे. आ. गोरे हे आक्रमक कार्यशैलीसाठी ओळखले जातात. त्यांचे संघटन कौशल्यही वादातीत आहे.
भाजपचा जिल्ह्यात मजबुतीने विस्तार करण्यासाठी आ. गोरे यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जवाबदारी देण्यात आली आहे. गेल्या सहा वर्षांत विक्रम पावसकर यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाची चांगली मोट बांधली. पक्षीय जवाबदाऱ्या नेटकेपणे पार पाडल्याने त्यांची
प्रदेश सचिवपदी वर्णी लागली आहे. प्रदेशाध्यक्ष आ. चंदकांत पाटील यांनी आ. गोरे व पावसकर यांना नियुक्तीपत्रे दिली. प्रदेश उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, परळी, ता. सातारा येथील नेते राजू भोसले उपस्थित होते. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विधी आघाडीचे मुंबईतील महासचिव अखिलेश चौबे यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला.