अमेरिका पाकला शस्त्रे देणार; भारत चिंतेत
नवी दिल्ली, दि. 6 – अमेरिका पाकिस्तानला पुन्हा शस्त्रपुरवठा सुरू करणार असल्याबद्दलच्या वृत्तामुळे भारतीय गोटात गंभीर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. जर पाकिस्तानला अमेरिकेने पुन्हा शस्त्रपुरवठा सुरू केला तर त्याचा परिणाम संघर्षात होऊन उपखंडातील संबंध सुरळीत होण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होईल.
गांधी-अब्दुल्ला कराराने भुट्टोंची पोटदुखी
नवी दिल्ली – पंतप्रधान इंदिरा गांधी व शेख अब्दुल्ला यांच्यातील समझोत्यामुळे पाकिस्तान व भारत यांचे संबंध सुरळीत होण्याच्या मार्गात अडथळा येणार आहे, असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान भुट्टो यांनी व्यक्त केले.
पाच दिवसांचा आठवडा करा
मुंबई – सर्व उद्योगधंद्यांत तसेच राज्य आणि
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा करण्याची मागणी करण्याचा निर्णय कामगार संघटनांच्या संयुक्त कृतीसमितीने घेतला आहे. समितीने सर्व संघटनांनी आपल्या मालकांकडे एका आठवड्याच्या आत अशी मागणी करून लढ्यास सिद्ध व्हावे असे म्हटले आहे.
गुजरातची राष्ट्रपती राजवट कायम
नवी दिल्ली – गुजरातमधील राष्ट्रपती राजवटीची मुदत वाढविण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री ब्रह्मानंद रेड्डी यांनी केली. गुजरातमध्ये पडलेल्या दुष्काळामुळे तेथे विधानसभेच्या निवडणुका घेण्यास परिस्थिती योग्य नाही. सरकार राज्यात शांतता व सुव्यवस्था तसेच दुष्काळी परिस्थिती यावर सतत लक्ष ठेवील व लवकरात लवकर निवडणुका घेईल.