वृत्तपत्रांना भेडसावणाऱ्या अडचणी प्रथम दूर करा
नवी दिल्ली – सरकारने वृत्तपत्रांपुढील अडचणी लक्षात घेऊन त्या दूर कराव्यात म्हणजे ग्रामीण भागातील जनतेपर्यंत प्रचार करणे वृत्तपत्रांना शक्य होईल, असे डॉ. तानेंजा यांनी म्हटले. सरकारचा आर्थिक कार्यक्रम जनतेला समजावून सांगण्याचे कामी वृत्तपत्रे सरकारशी सर्व तऱ्हेचे सहकार्य देण्यास तयार आहेत; परंतु सरकारने वृत्तपत्रांना वृत्तपत्रीय कागद रास्त भावात उपलब्ध करून दिला पाहिजे व वृत्तपत्राच्या आर्थिक अडचणीकडे लक्ष दिले पाहिजे. लोकशाही दृढमूल करण्याचे कामी वृत्तपत्रे मोठा हातभार लावतात, त्यासाठी अधिक वृत्तपत्रे निर्माण झाली पाहिजेत.
इराणला अमेरिकन शस्त्रविक्री चालू राहणार
वॉशिंग्टन – अध्यक्ष जिमी कार्टर यांनी इराणच्या शहाना असे अभिवचन दिले की अमेरिका इराणला करीत असलेली शस्त्रविक्री चालूच ठेवील. व्हाइट हाउसमधून काढण्यात आलेल्या एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे हे जाहीर करण्यात आले.
माओच्या ग्रंथावरील बंदी उठविणार?
नवी दिल्ली – माओत्से-तुंग यांचे ग्रंथ व पेकिंग रिव्ह्यू यांच्या आयातीवर बंदी आहे. ती बंदी मागे घेण्याचा प्रश्न सरकारच्या विचाराधीन आहे, असे अर्थमंत्री पटेल यांनी आज लोकसभेत सांगितले.