अलिप्ततेचे धोरण चालू ठेवणार
नवी दिल्ली, दि. 12 – जनता पक्ष सरकार अलिप्ततेचे धोरण पुढे चालविणार आहे. अलिप्तता म्हणजे सर्वांशी मैत्री, असे केंद्रीय आरोग्यमंत्री राजनारायण म्हणाले. भारताचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नियोजित रशिया भेटीवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास एका पत्रकाराने सांगितले असता राजनारायण म्हणाले, पंतप्रधानांना अमेरिका भेटीप्रमाणेच रशिया भेटीचे आमंत्रण आले आहे. ते सोयीनुसार दोन्ही देशांना भेटी देतील.
छोटी-छोटी स्वतंत्र शेते असावीत
नवी दिल्ली – छोट्या छोट्या स्वतंत्र शेतावर देशाच्या कृषी व्यवस्थेची उभारणी असावी. ही छोटी शेते “सेवा सहकारी संस्था’नी जोडली जावीत, असे गृहमंत्री चरणसिंग यांनी सुचविले आहे. उत्पादक उद्योगात कुटिरोद्योग व लघुउद्योग यांचे जाळे असावे, अशीही चरणसिंगांची सूचना आहे.
अरबांबरोबर शांतता करारास इस्रायल तयार
तेल अवीव्ह – शेजारी अरब देशांबरोबर “युद्धाची स्थिती’ संपविण्याचा, त्या देशांशी राजनैतिक व व्यापारी संबंध प्रस्थापित करण्याचा व सरहद्दी “खुल्या’ ठेवण्याचा करार करण्यास इस्रायली मंत्रिमंडळाने काल मान्यता दिली, असे “असोसिएटेड प्रेस’ वृत्त संस्थेने म्हटले आहे. या आठवड्यात अमेरिकेच्या मध्यस्थीने अरब देशांशी “अप्रत्यक्ष’ वाटाघाटी होणार आहेत, त्यावेळी परराष्ट्रमंत्री मोशे दायान हे कराराचा प्रस्ताव मांडतील.