बलुचिस्तानातून खान अब्दुल गफारखान हद्दपार
कराची – पठाणांचे ज्येष्ठ नेते खान अब्दुल गफारखान यांना बलुचिस्तान प्रांतातून हद्दपार करण्यात आले असून परवा त्यांचे येथे आगमन झाले. बंदी घातलेल्या नॅशनल अवामी पक्षाचे नेते अब्दुल वलीखान हे गफारखानांचे चिरंजीव आहेत. ते स्थानबद्ध आहेत. क्वेट्टा येथे स्थानिक नेत्यांकडून आपल्या मुलासाठी मदत मिळविण्याचे प्रयत्न गफारखान करीत होते, असे अधिकृत गोटातून सांगण्यात आले.
पाकिस्तानच्या पंजाबी बहुसंख्याकांविरुद्ध बलुची व पठाण टोळीवाल्यांत असंतोष निर्माण करण्याचेही गफारखान यांचे प्रयत्न चालले होते. म्हणून त्यांना हद्दपार केले गेले, असे माहितगार गोटातून कळते.
मराठी भाषेतील पहिलीच टेलिफोन डिरेक्टरी
पुणे – पुणे टेलिफोन्सच्या वतीने आज पहिलीच मराठी भाषेतील दूरध्वनी मार्गदर्शिका प्रकाशित करण्यात आली. राज्यातील मराठी भाषेतील ही पहिलीच मार्गदर्शिका आहे. टेलिफोन जिल्हा व्यवस्थापक एम. सी. वेंकटराम पत्रकारांशी बोलताना म्हणाले, एकूण 5 हजार प्रती छापण्यात आल्या असून प्रत्येक प्रतीची किंमत 6 रुपये राहील.
त्रिपुरातील सर्वात वयस्कर महिलेचे निधन
आगरताळा – मानजी माराक या त्रिपुरातील सर्वात वयस्कर समजल्या जाणाऱ्या महिलेचे निधन झाले. ही महिला 122 वर्षांची होती. सुमारे 20 वर्षांपूर्वी तिचा पती मरण पावला. तो 140 वर्षे जगला.