पिंपरी – शहरात दरोडा, जबरी चोरी आणि घरफोड्या करणाऱ्या के आर टोळीचा म्होरक्या किरण राठोड याच्यासह तिघांना दरोडा विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून पिस्तुलासह 12 लाख 11 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाई मध्ये पोलिसांनी चोरीचे दागिने घेणाऱ्या तीन सोनारांना देखील आरोपी केले आहे.
किरण गुरुनाथ राठोड (वय 26, रा. दिघी), अर्जुन कल्लप्पा सुर्यवंशी (वय 19, रा. कोरेगाव भीमा), संतोश जयहिंद गुप्ता (वय 18, रा खंडोबा माळ, भोसरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक महिन्यांपासून घरफोड्या करणारा केआर टोळीचा म्होरक्या दिघी परिसरात ओळख लपवून वास्तव्य करीत आहे, अशी माहिती दरोडा विरोधी पथकातील दिवंगत पोलीस अंमलदार राजेश कौशल्ये यांना मिळाली. त्यानुसार दिघी परिसरात सापळा लावून किरण राठोड याच्यासह तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक कार, 187 ग्रॅम सोने, एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे असा एकूण 12 लाख 11 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपी किरण राठोड हा पाच घरफोड्या आणि एक दरोड्याच्या गुन्ह्यात फरार होता. आरोपींनी चोरलेले दागिने कोरेगाव भीमा येथील दोन आणि परभणी येथील एका सराफ व्यावसायिकाला विकला. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी या तीनही सराफ व्यावसायिकांना देखील आरोपी केले आहे. तसेच दागिन्यांची विक्री करण्यासाठी मदत करणाऱ्या एकाला देखील पोलिसांनी आरोपी केले आहे.
टोळी 1412 नावानेही प्रसिद्ध
आरोपी किरण राठोड यांचे नाव टोळीला देण्यात आले आहे. त्यासाठी तो 1412 (इंग्रजीत 14 चा “के’ आणि बाराचा “आर’) हा अंक वापरत होता.