पिंपरी /पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांमध्ये मेट्रोच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रबळ होत आहे. एक ऑगस्टपासून पिंपरी ते शिवाजीनगर हा प्रवास मेट्रोने सुरू झाला असून लवकरच मेट्रोचा निगडीपर्यंत विस्तार होण्याची चिन्हे दिसत आहेत. खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेतली होती. केंद्रीय मंत्री पुरी यांनी मेट्रो निगडीपर्यंत नेण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला लवकरच मान्यता देऊ, असे आश्वासन खासदार बारणे यांना दिले होते. यामुळे मेट्रो निगडीपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. येत्या आठ ते नऊ महिन्यांत लोकसभा निवडणुका होणार आहेत, त्यापूर्वी बऱ्यापैकी काम मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहरातील पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी हे दोन्ही मार्ग अंतिम टप्प्यात आले असून आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी या दोन्ही मार्गावर मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यात, वनाज ते रामवाडी मार्ग नोव्हेंबर 2023 मध्ये तर स्वारगेट पर्यंतचा मार्ग जानेवारी 2024 च्या अखेरीस पूर्ण करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे. त्यामुळे, पुढील सहा महिन्यांत सुमारे 32 किलोमीटरचे मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत. सध्या वनाज ते रामवाडी मार्गवर वनाज ते रूबी हॉल पर्यंत मेट्रो सेवा सुरू आहे. तर पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गावर पिंपरी-चिंचवड ते सिव्हील कोर्ट पर्यंत मेट्रो सेवा सुरू करण्यात आली असून हे दोन्ही मार्ग पुणेकरांच्या पसंतीस उतरले आहेत.
बोगद्याचे काम पूर्ण
सिव्हील कोर्ट ते स्वारगेट हा सुमारे पाच किलोमीटरचा बोगद्याचा मार्ग आहे. या बोगद्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या प्रामुख्याने ट्रॅक तसेच विद्युत तारांच्या कामाचा समावेश होता. हे काम जवळपास पूर्ण झाले असून या मार्गात फडके हौद, मंडई तसेच स्वारगेट ही स्थानके आहेत. या तीनही स्थानकांचे काम सुमारे 80 टक्के पूर्ण झाले आहे. तर ही सर्व स्थानके भूमिगत असल्याने ती पूर्ण होण्यास थोडा वेळ लागत असल्याने या मार्गाचे काम जानेवारी 2024 अखेरीस पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
निगडीपर्यंत विस्तार
पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते स्वारगेट असा मेट्रो मार्गिका-एकचा मार्ग निश्चित करण्यात आला होता. पुणे महानगर क्षेत्र विकास प्रधिकरण यांनी सप्टेंबर 2018 मध्ये तयार केलेल्या कम्प्रेंसिव्ह मोबिलिटी प्लॅननुसार मेट्रो मार्गिकेचा निगडीपर्यंत विस्तार होणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले होते. मेट्रो निगडीपर्यंत नेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिलेल्या सुचनेनुसार महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्प लि ने सिस्ट्रा या आंतरराष्ट्रीय एजेन्सीकडून डीपीआर अर्थात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करुन घेतला होता. डीपीआरला पिंपरी चिंचवड महापालिकेने डिसेंबर 2018 मध्ये मंजुरी दिली होती. परंतु वेगवेगळ्या कारणामुळे हा प्रस्ताव लांबणीवर पडला आहे. राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली असून केंद्र सरकारकडून लवकरच मंजुरीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मेट्रोचा आणखी 4.413 किलोमीटर अर्थात निगडीपर्यंत विस्तार करण्याच्या कामाला सुरुवात होईल. महापालिका भवन हे पिंपरी-चिंचवडमधील पहिले स्थानक असले तरी मेट्रोचे रुळ चिंचवडजवळ पोहचले असून तेथून निगडीपर्यंतचे अंतर अधिक नाही.
वाढत्या लोकसंख्येची गरज
गेल्या काही दशकात पिंपरी-चिंचवड परिसरात शहरीकरणात वेगाने वाढ होत आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, पीसीएमसीची लोकसंख्या 17.27 लाख होती 2023 मध्ये ही लोकसंख्या 27 लाखांच्या पुढे गेली असून 2038 पर्यंत सुमारे 40 लाख होण्याची शक्यता आहे. खूप मोठ्या संख्येने नागरिक आणि विद्यार्थी नोकरी, व्यवसाय व शिक्षणासाठी पुण्यात जातात. तसेच पुण्यातूनही खूप मोठ्या संख्येने औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये रोज येतात. त्यामुळे पुण्यात वाढत असलेले मेट्रोचे जाळे या दोन्ही शहरांच्या नागरिकांसाठी महत्त्वाचे आहे.