दोन महिन्यांत शहरात 46 आत्महत्या

आर्थिक अडचणी, बेरोजगारी, कौटुंबिक कलह, तणावातून उचलले टोकाचे पाऊल


‘कहर करोना’चा : आत्महत्येत पुरुषांचे प्रमाण अधिक

पिंपरी – ‘करोना’ काळात अन्य आजार आणि अपघातांनी मृत्यू होण्याचे प्रमाण घटले असले तरी “करोना’मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेक जणांनी जीवन संपविण्यापर्यंतचे टोकाचे पाऊल उचलले आहे. गेल्या दोन महिन्यांत शहरात तब्बल 45 आत्महत्या झाल्याची नोंद पोलिसांच्या दप्तरी आहे. तर आत्महत्याचा प्रयत्न केल्याचा आकडा यापेक्षा खूप अधिक असू शकतो. यातील बहुतांश आत्महत्या आणि आत्महत्येचे प्रयत्न रोजगार गेल्याने किंवा आर्थिक अडचणीतून झाल्या आहेत.

काहींच्या नोकऱ्या गेल्या, तर काहींचे पगार थकले, तर काही जणांची पगार कपात झाली आहे. तर लहान-मोठा व्यवसाय करणाऱ्यांपुढे जगायचे कसे, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. अशावेळी सरकारकडून दिलेले अन्नधान्य व काही स्वयंसेवी संघटनांनी दिलेला मदतीचा हात, यामुळे काही दिवस संसाराचा गाडा हाकला. आता मदतीचा ओघ आटला. हाताला काम मिळाले तरच घरसंसाराचा गाडा हाकता येणार आहे. आता घर कसे चालवायचे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे नैराश्‍यातून अनेकजण जीवन संपविण्यापर्यंतचा टोकाचा निर्णय घेत आहेत.

समुपदेशन केंद्र उभारणीकडे दुर्लक्ष
गेल्या काही वर्षात शहरातील आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ज्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येतात त्यांचे समुपदेशन करण्यासाठी प्रभाग स्तरावर यंत्रणा उभारण्याची मागणी नागरिकांकडून झाली होती. मात्र प्रभाग स्तरावर असे केंद्र उभारणे शक्‍य नसल्याचे सांगत महापालिका स्तरावर एक केंद्र उभारण्याची घोषणा तात्कालिक महापौर राहुल जाधव यांनी केली होती. मात्र गेल्या वर्षभरात महापालिकेने याबाबत काहीच हालचाल केलेली नाही.

“लॉकडाऊन’पूर्वी असलेला तणाव सध्याच्या परिस्थितीमुळे आणखी वाढला असून, भविष्याबाबत अनिश्‍चितता आली आहे. करोनामुळे एकमेकांना भेटता येत नसल्याने आपल्या मनातील भावना व्यक्‍त करण्यासाठी पर्याय कमी झाले आहेत. तणाव दूर करण्यासाठी व्यक्‍त होणे फारच गरजेचे आहे. त्यासाठी सामाजिक संघटनांच्या हेल्पलाइन असून, गरज भासल्यास मानसपोचार तज्ज्ञांची मदत घ्यावी. परिस्थितीचा स्वीकार करून ही परिस्थिती कायम राहणार नसल्याचेही मनाला ठामपणे सांगावे. मनावरील ताण हलका करण्यासाठी योगा किंवा मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहावे.
– डॉ. धनंजय अस्टुरकर, मानसोपचार तज्ज्ञ

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.