कर्जत – तालुक्यातील मिरजगाव येथील शिंगवी कॉलनीत आज पहाटे चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला. चोरट्यांनी ऍड. मधुकर विठ्ठल कोरडे यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. तलवार गळ्याला लावत चोरट्यांनी घरातील तीन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेची माहिती समजताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच काही वेळातच पाच संशयितांना ताब्यात घेतले.
मंगळवारी (दि.23) रात्री ऍड. कोरडे हे नेहमीप्रमाणे पत्नी व दोन मुलांसह घरात झोपले होते. आज पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास सात दरोडेखोरांनी दरवाजाचा कडी, कोयंडा कटावणीने तोडून घरात प्रवेश केला. प्रारंभी दरोडेखोरांनी किचनमध्ये प्रवेश केला. तेथे उचकापाचक केली. त्याचवेळी किचनमधून आवाज आल्याने ऍड. कोरडे व त्यांचे कुटुंब जागे झाले. परंतु त्यांनी आरडाओरड करण्याच्या आत एकाने धावत जाऊन ऍड. कोरडे यांच्या गळ्याला तलवार लावली. त्याने कोरडे यांच्या पत्नी व मुलांना एका खोलीत बंद केले. तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर बाकी दरोडेखोरांनी घरातील सामानाची उचकापाचक करुन घरातील तीन लाख रुपयांचे सोन्या, चांदीचे दागिने चोरून नेले. जाताना दरोडेखोरांनी घराला बाहेरून कडी लावली होती.
घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, गृहविभागाचे उपअधीक्षक प्रांजली सोनवणे, उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सुरेश माने, अमरजित मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, श्वान पथक, फिंगर प्रिंट पथकाच्या माध्यमातून तपासाचे काम वेगाने सुरू झाले आहे. कर्जत पोलिसांनी बेलगाव येथून पाच संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली.