मे महिन्यात सर्वाधिक : तुळशी विवाहानंतर उडणार बार
पिंपरी – तुळशी विवाह झाल्यानंतर लग्नाचे बार उडणार आहेत. यंदा 46 शुभमुहूर्त असून मे महिन्यात सर्वाधिक मुहूर्त असल्याने हा महिना लग्नाच्या धामधुमीचा ठरणार आहे.
दरवर्षी तुळशी विवाहानंतर “लगीनघाई’चे दिवस सुरू होतात. 12 नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह आहे. “यंदा कर्तव्य’ असणाऱ्या घरात दिवाळीपेक्षा लग्नसराईची घाई बघायला मिळते. 2017 मध्ये शुक्राच्या अस्तामुळे 16 डिसेंबर ते 1 फेब्रुवारी या काळात लग्नाच्या तारखा नव्हत्या आणि संपूर्ण लग्नसराईत 82 तारखा होत्या. याबरोबरच 2018 मध्ये आलेल्या गुरू अस्तामुळे एक महिना उशिराने लग्नसराई सुरू झाली. यातच संपूर्ण लग्नसराईसाठी 86 मुहूर्त होते. यावर्षी पावसाळा जोरदार झाला आहे. त्यामुळे तुळशी विवाहानंतर नोव्हेंबरमध्ये असलेल्या चार मुहूर्तांवर विवाह सोहळ्यांची धूम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांत एकूण 11 शुभ मुहूर्त आहेत. ते साधण्याची लगबग सुरू झाल्याचे दिसते.
गतवर्षी गुरू अस्त असतानाही 86 शुभमुहूर्त होते; मात्र यंदाच्या वर्षीसुद्धा गुरू अस्त लग्नसराईत आल्यामुळे 46 शुभ मुहूर्तांवर वधू – वर पित्यांना लगीनघाई करावी लागणार आहे. शहरी भागात बहुतांश ठिकाणी मंडप टाकण्याची अडचण भासते. या पार्श्वभूमीवर आतापासूनच मंगल कार्यालयांच्या बुकिंगला प्राधान्य देण्यात येत आहे. शास्त्रानुसार गुरू व शुक्र या ग्रहांचा अस्त असताना विवाह करू नये, असे मानले जाते.
परंतु, ज्योतीर्निबंध, संस्कार रत्नमाला, प्रयोग पारिजात, स्मृतिसार समुच्चय या ग्रंथांमध्ये गुरू व शुक्र यांच्यापैकी एकाचा उदय असताना शुभकार्य करणे दोषास्पद होत नाही. स्मृतिसार समुच्चय या ग्रंथामध्ये अस्ताच्या काळात गुरू-शुक्र ग्रहांची शांती, होम, पूजा करून विवाहकार्य करावे, असे ज्योतिषांचे म्हणणे आहे. रुईकर पंचांगानुसार दुर्भिक्ष, महागाई, आणीबाणीप्रसंगी, तसेच वधू-वरांचे प्रौढ वय असताना, त्याचप्रमाणे अडचणींच्या प्रसंगी गुरू-शुक्र ग्रहांच्या अस्त काळातही विवाह मुहूर्त स्वीकारण्यास हरकत नाही. त्यामुळे या ग्रहांच्या अस्त काळातही पंचांगात विवाह मुहूर्त दिले आहेत.
अशा आहेत विवाह मुहुर्ताच्या तारखा
नोव्हेंबर : 20, 21, 23, 28
डिसेंबर : 1, 2, 3, 6, 8, 11, 12
जानेवारी : 18, 20, 29, 30, 31
फेब्रुवारी : 1, 4, 12, 14, 16, 20, 27
मार्च : 3, 4, 8, 11, 12, 19
एप्रिल : 15, 16, 26, 27
मे : 2, 5, 6,
8, 12, 14, 17, 18, 19, 24
जून : 11, 14, 15