पवनानगर – श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड-विसापूर विकास मंचातर्फे लोहगड-विसापूर किल्ल्यावर गेली 19 वर्षे दुर्गसंवर्धनचे काम चालू आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विसापूर वरील शिवमंदिरात मंचातर्फे दीपोत्सव करण्यात आला.
शिवमंदिर परिसरात दिवे व रांगोळ्या काढण्यात आले. या कार्यक्रमानंतर कार्यकर्ते गड भ्रमंती करत असताना दारुगोळा कोठारासमोर कार्यकर्त्यांना एक तोफगोळा जमिनीतून वर आलेला दिसला तो तोफगोळा बाहेर काढल्यानंतर अन्य ठिकाणी शोधले असता अजून एक तोफगोळा कार्यकर्त्यांना सापडला. हे दोन तोफगोळे सापडल्याचे पुरातत्व विभागाला कळवण्यात आले आहे. मागील वर्षी याच ठिकाणी तीन तोफगोळे कार्यकर्त्यांना सापडले होते, ते पुरातत्व विभागाच्या ताब्यात देण्यात आले. त्यावर्षी मंचाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी उत्खनन करण्याची पुरातत्व विभागाला मागणी केली तरी पुरातत्व विभागाकडून काही प्रतिसाद मिळाला नाही, याची खंत मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी केली.
आता तरी पुरातत्व विभागाने या ठिकाणी उत्खनन करून अजून, काही सापडते का हे पहावे, अशी अपेक्षा करतो असे सचिन टेकवडे यांनी सांगितले.
सापडलेले तोफगोळे हे कुल्फी तोफगोळे प्रकारातील असून, यामध्ये तोफेत दारू भरून नंतर वातीद्वारे हे उडवले जातात, अशी माहिती डेक्कन कॉलेजचे इतिहास संशोधक सचिन जोशी यांनी दिली.
या तोफगोळ्याचे वजन हे पाच ते दहा किलो आहे. या वेळी मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे, उपाध्यक्ष सचिन निंबाळकर, सचिव सागर कुंभार, अनिकेत आंबेकर अमोल गोरे, मनिष मल हे सर्व उपस्थित होते. आज शिवमंदिरातील दीपोत्सवाची तयारी सागर कुंभार व मनीष मधील यांनी केली. सचिन निंबाळकर यांनी अभिषेक केला.