पिंपरी – नागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रकल्प शहराच्या दृष्टीने माईलस्टोन ठरेल, असे प्रतिपादन आयुक्त राजेश पाटील यांनी केले. प्रकल्पाचे काम निश्चित केलेल्या तांत्रिक परिमाणानुसार कालबद्ध पध्दतीने पूर्ण करणे गरजेचे असून या कामाची गुणवत्ता आणि दर्जा उत्तम राखावा. तसेच या प्रकल्पाचे काम दिवाळीपर्यंत पूर्ण करावे. या प्रकल्पाची अंमलबजावणी करताना नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आयुक्त पाटील या वेळी म्हणाले.
सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रकल्पाचे काम मे. मॅट्रीक्स सिक्युरिटी अँड सर्व्हेलन्स प्रा.लि. यांना देण्यात आले असून, या कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत मंगळवारी (दि.14) बैठक आयुक्त राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत प्रकल्प अंमलबजावणीबाबत विविध सूचना आणि निर्देश आयुक्त पाटील यांनी दिले. त्या वेळी ते बोलत होते.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये पार पडलेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सहशहर अभियंता संदेश चव्हाण, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, दुरसंचार व अणुविद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता थॉमस नऱ्होना, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन देशमुख यांच्यासह मे. मॅट्रीक्स सिक्युरिटी अँड सर्व्हेलन्स प्रायव्हेट लिमीटेडचे अध्यक्ष एन. संदीप राजू, संचालक जे. डेव्हीड, उपाध्यक्ष आदित्य तसेच कंपनीचे अधिकारी आणि तंत्रज्ञ उपस्थित होते.
संगणकीय सादरीकरणाद्वारे दुरसंचार व अणुविद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता थॉमस नऱ्होना यांनी प्रकल्पाची माहिती दिली. महापालिकेच्या वतीने नागरी सुरक्षेसाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. शहराचे वाढते नागरीकरण विचारात घेता सुरक्षा यंत्रणा सुयोग्य पद्धतीने ठेवण्यासाठी शहराच्या महत्त्वाच्या भागात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. अशा प्रकारच्या उच्च तंत्रज्ञानाची यंत्रणा उभारणारी पिंपरी चिंचवड महापालिका ही देशातील पहिली महापालिका आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृहखात्याच्या वतीने तसेच महापालिकेमार्फत आणि स्मार्ट सिटी अंतर्गत सुमारे 4 हजार 590 सीसीटीव्ही कॅमेरे सध्या शहरात कार्यान्वित आहेत.
सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रकल्पाकरीता सन 2021-22 च्या अर्थसंकल्पात 200 कोटी रुपयांची अंदाजपत्रकीय रक्कम महापालिका सभेने मंजूर केली होती. या प्रकल्पाकरिता केंद्र शासनाच्या निर्णयानुसार विशेष तज्ज्ञ समितीदेखील गठीत करण्यात आली असून यामध्ये महापालिका आयुक्त राजेश पाटील, शहर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, महापालिका अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सहशहर अभियंता संदेश चव्हाण, कार्यकारी अभियंता थॉमस न-होना, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, आनंद भोईटे, बीएसएनएलचे मुख्य व्यवस्थापक डॉ. हेमंत सोनवणे, व्यवस्थापक शशांक भालेराव, सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकिशोर पाटील, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे मुख्य लेखाधिकारी सुनिल भोसले, डॉ. सुधीर आगाशे यांचा समावेश आहे.
प्राधान्यक्रमानुसार सीसीटीव्ही कार्यान्वित
सीसाटीव्ही सर्व्हेलन्स यंत्रणा उभारण्यासाठी नागरिक, पोलीस, लोकप्रतिनिधी तसेच एनजीओ यांनी मागणी नोंदविली. त्यावर पोलीस प्रशासन आणि महापालिका अभियंते यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून प्राधान्य यादी तयार केली आहे.