नगर (प्रतिनिधी) – नगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासा येथील खडका फाटा टोलनाक्यावर चारचाकीतून दोन लाख, तर घोडेगाव येथे 42 लाख रुपये, असे एकूण 44 लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती. चौकशी नंतर 42 लाख रुपये हे बँकेचे असल्याचे तपासात समोर आले.
मात्र, दुसर्या कारवाईतील दोन लाख रुपयांचा ताळमेळ न लागल्याने ते पैसे श्रीरामपूर येथील कोशागार कार्यालयात जमा करण्यात आले. अशी माहिती नेवासा मतदार संघाचे निवडणुक निर्णय अधिकारी शाहुराज मोरे दिली.
औरंगाबादहुन मुंबईकडे जाणारी (एम. एच.-20, ई. वाय- 9399) कारमधून दोन लाख रुपये रक्कम जप्त करण्यात आली. या कारला नाकाबंदी पथकाचे ई.डी. पाखरे यांच्या पथकातील पोलीस सुरेश कानडे, संभाजी गर्जे, नितीन भताने यांनी सोमवारी (दि.7) रोजी सकाळी नाकाबंदी करून कारवाई केली. तपासणी दरम्यान कारमधून एका पांढर्या पिशवीत पाचशे रुपयांच्या नोटा असलेली चार बंडले अशी दोन लाख रुपयांची रोकड आढळून आली.
घटनेनंतर पथकाने सहायक निवडणूक निर्णय अधिकारी समीर शेख, शेखर शेलार यांना बोलवले. त्यांनी टोलनाका येथे या रकमेचा पंचनामा करून कार नेवासा तहसील कार्यालयात जमा केली. ही रक्कम पुढील कारवाईसाठी श्रीरामपूर कोषागारात पाठविण्यात आले.
तर दुसरी कारवाई घोडेगाव येथे सोनई पोलीस ठाण्याचे भाऊसाहेब गडाख, गणेश आडगळे, वैभव झिने या भरारी पथकाने तब्बल 42 लाख रुपये पकडले. त्यानंतर या रकमेची चौकशी केली असता ती रक्कम बडोदा बँकेची असल्याचे समोर आले.