वॉशिंग्टन – भारत आणि चीन यांच्यातील सीमा वादावरून पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला असतानाच चीनच्या या साम्राज्यवादी भूमिकेचे अनेक पैलू समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार चीनची 43% जमीन त्यांनी इतर देशांकडून हडप केली आहे. पाच देशातील 41 लाख चौरस किलोमीटर जमीन चीनने अशा प्रकारे हडपली आहे. भारतीय भूमीवरही चीनची अशाच प्रकारे नजर असल्याने हा संघर्ष निर्माण होत आहे.
पूर्व तुर्कस्तान, हॉंगकॉंग, मकाऊ, तिबेट, इनर मंगोलिया या देशांची जमीन चीनने हडपली असून त्याच्यावर आपला दावा दाखल केला आहे. तसे पहायला गेले तर हॉंगकॉंग पूर्वीपासून चीनचाच हिस्सा होता; पण 1847 मध्ये ब्रिटिशांबरोबर झालेल्या युद्धामध्ये चीनने हॉंगकॉंग गमावले आणि ते ब्रिटनच्या ताब्यात गेले. पण 1997 मध्ये ब्रिटनने पुन्हा चीनला हॉंगकॉंग देऊ केले, मात्र आगामी 50 वर्ष मध्ये तेथे दुहेरी नागरिकत्वाची भूमिका चीनला घ्यावी लागणार होती.
तसेच हॉंगकॉंगमधील नागरिकांना संपूर्ण राजनैतिक स्वातंत्र्यही द्यावे लागणार होते. सध्या त्याच प्रकारे काम सुरू असले तरी हॉंगकॉंग ही चीनची भूमी मानण्यात येते. भारताच्या एकूण 43 हजार चौरस किलोमीटर भूमीवर चीनने कब्जा केला आहे. लडाख सीमेवरील 38 हजार चौरस किलोमीटर क्षेत्रावर चीनने आपले पाय पसरले असून पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर मधील 5000 चौरस किलोमीटर क्षेत्र चीनला देऊ केले आहे. ते 1949 मध्ये चीनमध्ये कम्युनिस्ट सरकार स्थापन झाल्यापासून चीनने या आपल्या साम्राज्यवादी दृष्टिकोनाला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली.
केवळ जमीनच नव्हे तर समुद्री सीमांवरही चीनने अतिक्रमण केले आहे. इंडोनेशिया आणि व्हिएतनाम यांच्यामध्ये असलेल्या दक्षिण चिनी समुद्रावरही चीनने आपला हक्क सांगितला आहे. जागतिक नकाशाचा विचार करता चीनची सीमा 14 देशांना लागून आहे.पण चीनने केलेल्या दाव्याप्रमाणे मात्र ही सीमा 23 देशांना लागून आहे ज्या देशांच्या भूमी चीनने हडप केल्या आहेत त्या देशांना लागून असलेले देशही चीन आपले शेजारी मानत आहे.