धर्मशाला – हिमाचल प्रदेश विधानसभेच्या मुख्य गेटवर आज खलिस्तानचे झेंडे बांधलेले आढळून आले तसेच विधानसभेच्या भिंतींवर खलिस्तानी समर्थनाच्या घोषणा लिहीलेल्या आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली.
विधानसभा संकुलाच्या मुख्य गेट क्रमांक एकच्या बाहेरील बाजूस हे झेंडे लावण्यात आले होते, ते आता प्रशासनाने हटवले आहेत. हा आमच्यासाठी एक धोक्याचा इशारा आहे, आम्ही अधिक सजकपणे या प्रकरणाचा छडा लावत आहोत असे वरीष्ट पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव सुधीर शर्मा यांनीही ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, विधानसभेच्याच प्रवेशद्वारावर खलिस्तानचा झेंडा आणि भिंतींवर घोषणा लिहिल्या जाणे दुर्दैवी आहे, तेथे सीसीटीव्हीची सुरक्षा उपलब्ध नसणे आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती यामुळे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे असेही त्यांनी म्हटले आहे.