नवी दिल्ली – देशातील एलपीजी ग्राहकांना सुलभतेने उत्तम दर्जाची सेवा मिळण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून आता कोणत्या वितरकांकडून एलपीजी सिलिंडर पुन्हा भरून हवा आहे याची निवड ग्राहकांनी करण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे.
देशातील काही शहरांमध्ये याची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या शहरांमध्ये पुण्याचा समावेश आहे. त्यामुळे पुणेकरांना लवकरच हव्या त्या वितरकाकडून एलपीजी गॅस सिलेंडर भरून घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या निर्णयानुसार देशातल्या काही शहरांमध्ये ही सेवा प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला उपलब्ध होणार असून त्याच्या निष्कर्षांनंतर व्यापक स्तरावर देशभरात या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.
सध्या एचपी, भारत पेट्रोलियम आणि इंडेन या कंपन्यांचे गॅस सिलेंडर वापरासाठी उपलब्ध आहेत. मात्र, हे सिलेंडर वितरीत करण्यासाठी स्थानिक पातळीवर वितरकांना एजन्सी दिली जाते. मात्र, आता आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या कोणत्याही वितरकाकडून आपण संबंधित कंपनीचा गॅस सिलेंडर घेऊ शकतो. यासाठी निवडण्यात आलेल्या शहरांमध्ये पुणे शहरासोबतच चंदीगढ, कोयम्बतूर, गुडगाव आणि रांची या शहरांचा देखील समावेश आहे.
कसा निवडाल पर्याय?
गेल्या वर्षभरापासून देशात निर्माण झालेल्या करोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे अनेक कंपन्यांनी ऑनलाईन किंवा मोबाईलवर सिलेंडर बुक करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
इंडेन, एचपी आणि भारत पेट्रोलियम या प्रमुख कंपन्यांचे एलपीजी गॅस सिलेंडर उपलब्ध आहेत. त्यानुसार मोबाईल ऍप किंवा ऑनलाईन वेबसाईटवरून सिलेंडर बुकिंग करताना ग्राहकांना त्यांच्या परिसरात सेवा देणाऱ्या डिलिव्हरी डिस्ट्रिब्युटर्सची अर्थात वितरकांची यादी दाखवली जाईल. त्यामधून ग्राहकांना हवा तो पर्याय निवडण्याची सुविधा असेल.