संयुक्तराष्ट्रे: जगभरातील तब्बल 9 अब्ज डॉलर किंमतीच्या तंबाखूजन्य उत्पादनांमुळे युवकांच्या आयुष्याची माती होते. जगभरातील 13 ते 15 वयोगटातील तब्बल 40 दशलक्ष मुलांना तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन लागले आहे. ही मुले निकोटीनच्या आहारी गेली आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
आजच्या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त किशोरवयीन मुलांमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल जागरूकता वाढवण्यावर संयुक्त राष्ट्राच्या संस्थेच्यावतीने भर दिला जात आहे. आजच्या तंबाखूविरोधी दिनानिमित्त 13-17 वर्षांदरम्यानच्या शाळकरी मुलांसाठी “डब्लूएचओ’ने एक किट विकसित केले आहे. या किटच्या माध्यमातून या मुलांना तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती दिली जात आहे.
दरवर्षी तंबाखू उद्योग आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी 9 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करतात. ते निकोटीन आणि तंबाखूजन्य पदार्थांसाठी वाढत्या प्रमाणात तरुणांना लक्ष्य करतात. या तंबाखूजन्य पदार्थांमुळे दरवर्षी 80 लाख जणांचा मृत्यू होतो. सध्या जगभर फैलावलेल्या करोनाच्या साथीमध्येही तंबाखू आणि निकोटीनच्या उद्योगांकडून उत्पादनांच्या जाहिराती जोरात केल्या जात आहेत. या पदार्थांमधील व्यसनाधिनता वाढवणाऱ्या घटकांमुळे व्यक्तीची विषाणूला प्रतिकार करण्याची क्षमताच नष्ट होते, असे “डब्लूएचओ’ने म्हटले आहे.
धूम्रपान करणाऱ्या 10 पैकी नऊ जण वयाच्या 18 वर्षांपूर्वीच धूम्रपानाला प्रारंभ करतात. म्हणूनच या वयापूर्वीच तरुणांना शिक्षण देणे अत्यावश्यक आहे. तंबाखूच्या सेवनाचे 15 हजार प्रकाची उत्पादने बाजारात आहेत. त्यात तंबाखू कॅन्डी, च्युईंग गम अशी उत्पादनेही आहेत. ई-सिगारेटसारख्या उत्पादनांवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच कडक कायदा लागू करुन देशातील मुलांना मुलांचे संरक्षण करावे लागेल, असेही “डब्लूएचओ’ने म्हटले आहे.