देशातील करोना लढाईविरोधात पैशांच्या स्वरुपात मोठे योगदान दिलेल्या बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याने बहिणीसाठीही मोठी मदत केल्याचे समजते. लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकून पडलेल्या बहिणीला तिच्या घरी सुखरूप पोहोचवण्यिासाठी अक्षयने अख्खी फ्लाईट बुक केल्याचे समजते. अक्षयने बहिण अलका, तिची दोन मुले आणि मेड अशा चौघांसाठी लाखो रुपये मोजून मुंबई-दिल्ली फ्लाईट बुक केली.
दरम्यान, यामुळे सोशल मिडियावर अक्षयकुमारला ट्रोल करण्यात येत आहे. करोनामुळे देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपत आला आहे. यामुळे सुमारे दोन महिन्यांहून जास्त काळ सर्वजण घरातच आहेत. तर काही जण ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. त्यातच अक्षय कुमारची बहिणही मुंबईत अडकली आहे.
अक्षयने त्याच्या बहिणीला आणि मुलांना करोना संसर्गाचा धोका होऊ नये आणि घरी सुखरूप परतता यावे यासाठी अख्खी फ्लाईट बुक केली. तसेच कोविड-19 साठी लागू असलेले सोशल डिस्टन्सिंग, प्रोटोकॉल, सुरक्षा उपायांचे काटेखोर पालन त्यासाठी केले गेले.
मात्र, अक्षय कुमारची ही कृती अनेकांच्या पचनी पडली नाही. यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी अक्षय कुमारला ट्रोल करत आक्षेपार्ह टिका केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका उद्योगपतीनेही त्याच्या कुटुंबातील चार जणांसाठी दिल्ली भोपाळ अख्खी फाईट बुक केली होती.