अतिवृष्टीमध्ये मृत चौघाजणांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख मदत

4417 कुटुंबांना 2 कोटी 20 लाख 85 हजार सानुग्रह वाटप

कोल्हापूर: अतिवृष्टीमध्ये जिल्ह्यातील मयत झालेल्या चौघाजणांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत आज करण्यात आली. त्याचबरोबर आजअखेर जिल्ह्यातील 4417  पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 5 हजार अशी 2 कोटी 20 लाख 85 हजार सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अतिवृष्टीमध्ये चंदगड तालुक्यातील हलकर्णी गावचे जिजाबाई सतुप्पा कडुकट (वय 55) यांचा तसेच आजरा तालुक्यातील इटे गावचे केशव बाळू पाटील (वय 55) यांचा 6 ऑगस्ट रोजी, गडहिंग्लज तालुक्यातील कडलगे गावचे चिंतामणी मारुती कांबळे (वय 45) यांचा 12 ऑगस्ट रोजी आणि पन्हाळा तालुक्यातील पिंपळे तर्फ सातवे येथील तानाजी पाडुरंग पोवार (वय 35) यांचा 9 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयाची मदत आज देण्यात आली.

पूरग्रस्त कुटुंबांना ग्रामीण भागात 10 हजार आणि शहरी भागात 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. त्यापैकी 5 हजार रुपयांचा रोख वाटप कालपासून करण्यात आले. यात ग्रामीण भागातील 4130 आणि शहरी भागातील 287 अशा एकूण 4417 कुटुंबांना 2 कोटी 20 लाख 85 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित कुटुंबांनाही अनुदान वाटप सुरु आहे.


कोल्हापूर डिझास्टर रिलिफ फंड खात्यात मदत करावी

जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोल्हापूर डिझास्टर रिलिफ फंड या नावाने बँक ऑफ इंडियाच्या शाहूपुरी शाखेत आज खाते उघडण्यात आले आहे. खातेक्रमांक 090110110018730 असा असून IFSC CODE BKID0000901 असा असून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी या खात्यामध्ये मदत जमा करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी केले आहे.


मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या उपस्थितीत अनुदान वाटप

मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी इचलकरंजी येथील स्नेहदीप हॉल मधील पूरग्रस्तांच्या शिबीराला आज भेट दिली.  याठिकाणी रोख 5 हजार रुपये सानुग्रह अनुदानाचे वाटप श्री. देशमुख यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ महिलेच्या हस्ते लाभार्थ्यांना करण्यात आले. यावेळी सांगलीतील हरिपूर प्रमाणे हातकणंगले तालुक्यातील चंदुर हे गाव सोलापूर सोशल फौंडेशनच्यावतीने दत्तक घेत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. याप्रसंगी आमदार सुरेश हाळवणकर, तहसिलदार सुधाकर भोसले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)