पुणे- “ओमायक्रॉन’ची लागण झालेले नागरिक भारतात कर्नाटक राज्यात सापडल्याने केंद्र सरकार खडबडून जागे झाले आहे. परंतु, आता ज्या-ज्या शहरात परदेशातून नागरिक येत आहेत, त्यांची करोना चाचणी करणे बंधनकारकच करण्यात आले आहे.
पुण्यातही परदेशातून आलेल्या सुमारे 350 जणांची यादी महापालिकेकडे आहे, त्यांचेही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
केंद्रसरकारने परदेशातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुण्यात आलेल्या सुमारे 350 नागरिकांची आता टेस्ट होणार असून, त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू असल्याचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी सांगितले.
करोनाच्या संसर्गापेक्षा सुमारे सातपट वेगाने “ओमायक्रॉन’चा संसर्ग आहे. त्यामुळेच जगातील सर्व देश अलर्ट झाले आहेत. केंद्र सरकारने मागील आठवड्यात त्यादृष्टीने बैठक घेऊन परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच “आरटीपीसीआर’ चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यात आता महाराष्ट्राच्या शेजारीच असलेल्या कर्नाटकात “ओमायक्रॉन’ची लागण झालेले दोन नागरिक सापडले आहेत, त्यामुळे या विषयातील गांभीर्य अधिक वाढले आहे. राज्य सरकारनेही परदेशातून आलेल्या प्रवाशांची विमानतळावरच आरटीपीसीआर चाचणी घेण्यासोबत त्यांना विलगीकरणात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, आज राज्य आरोग्य विभागाने व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे राज्यातील सर्वच आरोग्य प्रमुखांशी संवाद साधून करोना संदर्भातील आढावा घेतला. तसेच परदेशातून आलेला प्रवाशांची तपासणी आणि विलगीकरणाबाबत सूचना देतानाच संभाव्य धोका टाळण्यासाठी दि. 1 नोव्हेंबरनंतर परदेशातून येथे परतलेल्या नागरिकांचा आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अशा प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या परिचितांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिका पथके स्थापन करून लवकरच ही तपासणी मोहीम राबवणार असल्याचे डॉ. भारती यांनी सांगितले.
परदेश प्रवास करून आलेल्या नागरिकांची यादी आम्हाला मिळाली आहे. आम्ही त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू केले असून त्यांची टेस्ट करून घेणार आहोत. बुधवारीही 17 जणांची करोना चाचणी करून घेतली होती, ती निगेटिव्ह आली आहे. अन्य नागरिकांचीही करून घेणार आहोत.
– डॉ. संजीव वावरे,
साथरोग विभाग प्रमुख, पुणे महापालिका