मुंबई – मुंबईतील पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंकेतील कोट्यवधी रूपयांच्या घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी आज तब्बल 32 हजार पानांचे आरोपपत्र पाच आरोपींच्या विरोधात येथील महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात सादर केले आहे.
या आरोपपत्रात बॅंकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, माजी अध्यक्ष वरयमसिंग, माजी संचालक सुरजितसिंग अरोरा, एचडीआयएल संस्थेचे संचालक राकेश आणि सारंग वाधवान यांची नावे आहेत. भारतीय दंडविधान कलमाच्या फसवणूक, पुरावा नष्ट करणे, भ्रष्टाचार, खोटी कागदपत्रे तयार करणे इत्यादी आरोपांखाली हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यातील पाचही आरोपी सध्या अटकेत आहेत. या पाच जणांखेरीज आर्थिक गुन्हा शाखेने बॅंकेच्या सात आजी माजी कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या विरोधातही गुन्हे दाखल केले असून त्यांच्यावरील पुरवणी आरोपपत्र नंतर सादर केले जाणार आहे.
या 32 हजार पानी आरोपपत्रात आरोपींच्या विरोधातील अनेक पुरावे सादर करण्यात आले आहेत. त्यात बॅंकेच्या ऑडीट रिपोर्टचा फॉरेन्सीक अहवाल, आरोपींनी खरेदी केलेल्या मालमत्ता, वाधवान यांच्यावर मेहरबानी केल्याबद्दल संबंधीतांना दिलेल्या लाचेच्या रकमांचा तपशील व त्याचे पुरावे अशी सारी कागदपत्रे यात सादर करण्यात आली आहेत. बॅंकेच्या ठेवीदारांसह एकूण 340 जणांच्या साक्षीही यात लिखीत स्वरूपात सादर करण्यात आल्या आहेत. पीएमसी बॅंकेचा हा एकूण घोटाळा 6700 कोटी रूपयांचा आहे. या बॅंकेच्या खातेदारांनी बॅंकेच्या विरोधात सध्या मोठे आंदोलन उभारले आहे. अजूनही या बॅंकेतील पैसे काढण्यावरील निर्बंध उठवण्यात आलेले नाहीत. रिझर्व्ह बॅंकेने 23 सप्टेंबर 2019 मध्ये बॅंकेतून पैसे काढण्याविषयीचे निर्बंध लागू केले आहेत.